तेजीचा प्रवास कायम : निफ्टी 11,937.65 वर स्थिरावला
वृत्तसंस्था / मुंबइ
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. बँकिंग आणि धातू क्षेत्रातील समभागांनी बाजारातील तेजी कायम ठेवली. दिवसअखेर सेन्सेक्स 162.94 अंकांनी वधारुन निर्देशांक 40,707.31 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 40.85 अंकांनी वधारून 11,937.65 वर स्थिरावला आहे.
दिवसभरात प्रामुख्याने बँकिंग आणि धातू यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. निफ्टीमधील बँकिंगचा निर्देशांक
मोठय़ा प्रमाणात वधारुन नंतर स्थिरावला. तर वाहन आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मात्र घसरणीचे वातावरण राहिले.
दिवसभरात सेन्सेक्सचा निर्देशांक 825.54 अंकांच्या मर्यादेत वरखाली होत राहिला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 4 टक्के वाढ पॉवरग्रिड कंपनीच्या समभागांमध्ये पहावयास मिळाली. तसेच भारती एअरटेल, टाटा स्टील, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
जागतिक पातळीवरील आशियातील बाजारात हाँगकाँग, जपानचा टोकीओ आणि दक्षिण कोरियाचा सोल तेजीत बंद झाला. चीनचा शांघाय निर्देशांक मात्र नुकसानीत राहिला. युरोपातील बाजारात प्रारंभी घसरणीचा कल राहिला होता. याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटनकडून झालेली कर्जाच्या नियमांची घोषणा हे होते. तसेच पहिल्या सहामाहीतील कर्जाचा टप्पा हा उचांकी राहिला असल्याचाही परिणाम बाजारातील कामगिरीवर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूडचा भाव 1.14 टक्क्यांनी घटून 42.67 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे. विदेशी विनिमय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने सुरुवातीची तेजी गमावत 9 पैशांनी घसरुन 73.58 वर बंद झाला आहे. या वातावरणाचा परिणाम शेअरबाजारांवर झाला.