स्टार सलामीवीर रोहित शर्मा संघात दाखल, मयांक अगरवाल-हनुमा विहारी यांच्यापैकी एकावर टांगती तलवार, पुढील आठवडय़ात दोन्ही संघ आमनेसामने भिडणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मेलबर्नमधील दुसऱया कसोटी सामन्यात भारताची पाच गोलंदाज खेळवण्याची रणनीती उत्तमरित्या फळली. पण, सिडनीतील तिसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विशेषतः फलंदाजीच्या आघाडीवर निवडीचे अनेक पेच सोडवावे लागतील, असे संकेत आहेत. स्टार सलामीवीर रोहित शर्मा बुधवारी भारतीय संघात दाखल झाला असून यामुळे कोणाला वगळले जाणार, याचे औत्सुक्य असेल. उभय संघातील तिसरी कसोटी दि. 7 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.
गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा प्रचंड यशस्वी ठरला होता. पण, आता मॅच प्रॅक्टिस नसल्याने व एका वेगळय़ा वातावरणात ऑस्ट्रेलियात दाखल झाला असल्याने रोहित निश्चितपणाने खेळू शकेल, असे सांगता येत नाही, अशी सद्यस्थिती आहे.
‘दोन-एक आठवडे क्वारन्टाईन असल्याने रोहितशी आपल्याला सर्वप्रथम संवाद साधावा लागेल. शिवाय, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला कसे वाटते, हे विचारुन घ्यावे लागेल’, असे रवी शास्त्री यापूर्वी मंगळवारी म्हणाले होते. रोहित बुधवारी संघात समाविष्ट झाल्यानंतर आता निवडीचे पेच संघव्यवस्थापनासमोर असणार आहेत.
युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच उत्तम प्रगल्भता दाखवली. त्यामुळे, भारतीय संघव्यवस्थापन रोहितला मयांक अगरवालच्या जागी आघाडीवर किंवा हनुमा विहारीच्या जागेवर मध्यफळीत समाविष्ट करुन घेऊ शकेल, असे संकेत आहेत. मयांक अगरवाल सध्या अतिशय खराब फॉर्ममध्ये असून या मालिकेत त्याला केवळ एकदाच दुहेरी धावसंख्या गाठता आली आहे.
2018 मध्ये त्याने जी तडाखेबंद फलंदाजी साकारली, त्याची तो पुनरावृत्ती करु शकलेला नाही. पण, तरीही संघव्यवस्थापनाने त्याला डच्चू देण्याचा निर्णय घेतला तर हे मोठे पाऊल असणार आहे. याशिवाय जखमी गोलंदाज उमेश यादवच्या जागी टी.नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात संपन्न झालेल्या न्यूझीलंड दौऱयात रोहित शर्माचा खरा कस लागणार होता. पण, त्यावेळी दौऱयाच्या मध्यातच तो जखमी झाला व संघातून बाहेर फेकला गेला होता. रोहितने यापूर्वी 10 नोव्हेंबरला आयपीएल फायनल खेळली, ती लढत रोहितसाठी शेवटची ठरली. त्यानंतर प्रथमच तो आता मैदानात उतरणार आहे. त्यामुळे, देखील रोहितची येथे कसोटी लागू शकते.
4 सामन्यांची ही कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असून भारतीय संघ 2018 मधील विजयाची पुनरावृत्ती करणार का, हे तिसऱया कसोटीत काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकेल. रोहित संघात दाखल झाला असल्याने अनेक पर्याय खुले झाले आहेत. पण, सलामीचा पेच यामुळे निकाली लागणार का, हे येणारा काळच ठरवेल, असे सध्याचे संकेत आहेत.
अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर मी काही प्रमाणात मेहनत घेतली. पुढे त्याने नेतृत्वाचे गुण स्वतः विकसित केले. शांत राहणे, संयमावर भर देणे, हे अजिंक्यचे बलस्थान आहे आणि नेतृत्वातील कौशल्यात त्याच्यासाठी हेच महत्त्वाचे ठरले आहे.
-अजिंक्य रहाणेचे मार्गदर्शक प्रवीण आमरे
आयपीएल स्पर्धेमुळे शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांचे मनोबल विशेष उंचावले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत खेळल्याने त्यांच्यात दृढ आत्मविश्वास निर्माण झाला. मेलबर्न कसोटीत या बळावरच ते दोघेही यशस्वी पदार्पण करु शकले आहेत.
-भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
अलीकडे मॅच प्रॅक्टिस नसल्याने रोहित सलामीला उतरु इच्छितो का, हे सर्वप्रथम पहावे लागणार आहे. त्याने मध्यफळीत खेळणे रास्त मानले तर त्यानुसार बदल करावे लागतील. संघव्यवस्थापनाच्या रोहितकडून काय अपेक्षा आहेत, हे देखील महत्त्वाचे ठरु शकते.
-माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद
मयांक अगरवाल व हनुमा विहारी या दोघांनाही वगळून रोहितचा मध्यफळीत समाविष्ट करणे व शुभमन गिल-केएल राहुल यांना सलामीला पाठवणे योग्य ठरु शकते.
-माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर