चिपळूण/प्रतिनिधी
गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या धरण फुटी नंतर रविवारी पुन्हा एकदा तिवरे गावावर निसर्ग कोपलेलाच असल्याचे दिसून आले आहे. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले. विजेचे खांब, झाडे कोसळल्याने गावात पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.
गेल्यावर्षी तिवरे गावात अतिवृष्टीमुळे धरण फुटून मोठी जिवीत व वित्तहाणीतून गाव सावरत असतानाच रविवारी सायंकाळी वादळी पावसाने पुन्हा एकदा गावात हाहाकार माजवला. अचानक आलेल्या वादळाने घरांचे पत्रे उडाले. काहींचे छप्परच उडून गेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. झाडेही ठिकठिकाणी कोसळून मार्ग बंद झाले आहेत. तालुक्याच्या एका टोकाला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने चिपळुणात लगेच याची माहिती पोहचली नाही. शिवसेनेचे मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र सायंकाळ झाल्याने आणि अंतर ही दूरचे असल्याने सोमवारीच नुकसानीचे पंचनामे काम हाती घेतले जाणार आहे.
दरम्यान, तालुक्याचा पूर्व विभागातील शिरगाव पोफळी परिसरातही वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे कराड चिपळूण मार्गावर दोन ठिकाणी झाड उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प होती तर अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे लाखोहुन नुकसान झाले सर्वाधिक नुकसान पोफळी सय्यदवाडी परिसरात झाले आहे. 11 के व्ही चे विद्युत पोल तुटल्यामुळे कुंभार्ली कोडफणवणे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता त्यामुळे शिरगावला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती सरपंच अनिल शिंदे यांनी दिली
शनिवारी दुपारच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्याने सुरुवात केली आणि साऱ्याची तारांबळ उडाली तर गारांच्या पावसासह मुसळधार पाऊस पडला जवळजवळ अर्धा तास पडलेल्या पावसाने मात्र साऱ्यांना हवालदिल करून सोडले त्यामध्ये कराड चिपळूण मार्गावर शिरगाव बोधवाडी, सय्यदवाडी याठिकाणी झाड उन्मळून कोसळले त्यामुळे काही तास वाहतूक ठप्प होती ती कुंभार्ली मार्ग करण्यात आली होती तर जेसीबीच्या साहयाने काही वेळातच रस्त्यावरील झाड बाजूला करून कराड चिपळूण मार्ग सुरू करण्यात आला तर शिरगाव माजी सरपंच सुधीर शिंदे यांच्या निवासस्थानी झाड कोसळले त्यामुळे त्याठिकाणी असलेले 11 के व्ही चा पोल तुटल्यामुळे कोडफणवणे कुंभार्ली येथील वीज पुरवठा बंद पडला तर काही पोफळी गावाला सुद्धा त्याचा फटका बसला आहे.