शहर परिसरात मकर संक्रांत उत्साहात साजरी
प्रतिनिधी / बेळगाव
सूर्याचे तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते. तसेच आपले तेज, यश, कीर्ती, वर्धिष्णू होवो, अशा शुभेच्छा देत सावधपणे तिळगुळाची देवाण-घेवाण करत शहरात मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा झाला. कोरोनाच्या सर्व कटू स्मृती बाजूला सारत गोडवा वाढविणे हेच महत्त्वाचे, असे जणू या सणाने अधोरेखित केले.
संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत मलिदा, शेंगापोळी, गुळपोळी यासह अनेक गोड पदार्थांची विक्री तेजीने झाली. त्याचप्रमाणे सुगड खरेदीही झाली. देवघरात सुगड ठेवून त्यामध्ये तिळगूळ घालून पूजा करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा या सुगडांना रंग देऊन ते अधिक आकर्षक करण्यात आले होते.
यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक संदेशांची, संक्रांतीला केंद्रीयभूत ठेवून चारोळय़ा आणि कवितांची देवाण-घेवाण झाली. मात्र सणाच्या निमित्ताने गेले वर्षभर परस्परांना मोकळेपणाने भेटता न आल्याने यंदा तिळगूळ देण्याघेण्यासाठी विशेष उत्साह दिसून आला.
सायंकाळी तिळगूळ देण्यासाठी बाहेर पडलेल्या गर्दीमुळे बाजारपेठेत वर्दळ वाढली. तिळगूळ खरेदी करण्यासाठी सकाळी गर्दी झाली. त्यातही आपल्याला आवडेल आणि शाळेमध्ये तिळगूळ वाटताना उठून दिसेल, असा डबा शोधण्यात बालचमू गर्क होते. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. याच दरम्यान महिलावर्ग हळदी-कुंकू करतो. त्यामुळे वाण म्हणून देता येण्याजोग्या अनेक लहान-मोठय़ा वस्तू बाजारात आल्या आहेत.
वास्तविक काळारंग हा तसा दुय्यम मानला जातो. एरव्ही काळे वस्त्र सहसा खरेदी केले जात नाही. मात्र संक्रांतीला आवर्जून काळा कपडा परिधान केला जातो. काळा कपडा उष्णतावर्धक मानला जातो. थंडीच्या दिवसात काळे वस्त्र शरीरात उब निर्माण करते. हा त्या मागचा हेतू आहे. त्यामुळे महिलावर्गाने संक्रांतीदिवशी आवर्जून काळा पोषाख परिधान केला होता. दुकानदारांनीही दुकानांच्या बाहेर काळय़ारंगाचे पोषाख आवर्जून टांगले होते.









