वार्ताहर / दोडामार्ग:
वेंगुर्ले तसेच मालवण या दोन ठिकाणी मणेरी येथील नदीचे पाणी नेणाऱया पाईपलाईनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सासोली – हेदुसमध्ये या पाईपलाईनमुळे साईडपट्टी पूर्णतः उखडली गेली असून येणाऱया पावसाळय़ात वाहनचालकांना पुन्हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
वेंगुर्ले तसेच मालवण या दोन ठिकाणी तिलारी जलाशयाचे पाणी नेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी मणेरी येथील नदीपात्रातून पाईपलाईनद्वारे पाणी नेले जाणार आहे. या पाईपलाईनचे सध्या सासोली – हेदुस परिसरात काम चालू आहे. दोडामार्ग – बांदा या महामार्गालगतच्या साईडपट्टीमधून ही पाईपलाईन नेण्यात येत आहे. गेल्या एक दोन वर्षांपासून या पाईपलाईनचे काम सुरू आहे. या पाईपलाईनच्या कामावरून अनेक ठिकाणी ग्रामस्थांचे पाईपलाईनशी निगडित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यासोबत खटकेही उडाले आहेत. ज्या भागातून ही पाईपलाईन जात आहे, तेथील रस्त्यालगतची साईडपट्टी पूर्णतः उखडली गेली आहे. सध्या उन्हाळय़ात या उखडलेल्या साईडपट्टीमुळे आसपासची घरे व वाहन चालक यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच पुढील महिन्यातील पावसाळय़ात देखील या साईडपट्टीवर दलदल होणार आहे. गेल्याच आठवडय़ात झालेल्या पावसादरम्यान या साईडपट्टीच्या दलदलीत वाहने रुतून बसली होती. त्यावरून येणाऱया पावसाळय़ात देखील या ठिकाणी काय परिस्थिती उद्भवेल ते पहायला मिळाले आहे. ते पाहता पावसाळय़ापूर्वी या पाईपलाईन तसेच साईडपट्टीचे काम त्वरित पूर्ण करून सर्वांची गैरसोय टाळावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. दरम्यान, आपल्या राजकीय बळाचा वापर करीत काँग्रेसचे जिल्हा चिटणीस तथा सासोली – हेदुसचे रहिवासी बाळा धाऊस्कर यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून या साईडपट्टीचे काम त्वरित सुरू करण्यास भाग पाडल्याचे धाऊस्कर यांनी सांगितले.









