प्रवासी, व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त
वार्ताहर / दोडामार्ग:
या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे तिलारी रामघाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या घाटाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होताच बुधवारपासून हा घाट मार्ग वाहतुकीस पूर्णपणे मोकळा करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याबरोबर सिंधुदुर्ग, गोवा राज्यातील प्रवाशांची गैरसोय आता दूर झाली आहे. यामुळे याबाबतचा पाठपुरावा करणारे शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस व प्रवाशांनी पणजी-कोल्हापूर एस.टी. बसचे स्वागत करत चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.
या वर्षी जोरादार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा तिलारी रामघाटालाही मोठा तडाखा बसला. 2 ऑगस्ट 2019 रोजी या घाटात अनेक ठिकाणी मोठ-मोठय़ा दरडी कोसळल्याने या घाट मार्गावरील दोडामार्ग, सिंधुदुर्ग, गोवा राज्य ते चंदगड, बेळगाव, कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मुसळधार पाऊस पडत असल्याने तात्काळ या घाटाची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. दरम्यान, गणेशचतुर्थी, दिवाळी सण आले या सणापूर्वी तरी हा घाट मार्ग दुरुस्ती करण्यात यावा, अशी नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱयांची मागणी होती. मात्र, त्या दरम्यान हा घाट रस्ता वेळीच दुरुस्ती करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवासी आणि व्यापारीवर्गावर मोठा परिणाम झाला. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हा घाट मार्ग केव्हा सुरू होतो, याकडे प्रवासी व व्यापाऱयांचे लक्ष लागून होते. ती व्यापारी व प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली. बुधवारपासून तिलारी रामघाटातून एसटी बस सुरू करण्यात आल्याने शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस व प्रवाशांनी एस.टी. बसचे स्वागत केले. यावेळी संदीप कोरगांवकर, दौलत राणे, हेमंत कर्पे, सर्वेश कर्पे, दत्ताराम देसाई आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगडचे विशेष अभिनंदन
दरम्यान, बुधवारपासून वाहतुकीस सुरू केलेल्या तिलारी घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर व उपविभाग चंदगड येथील उपअभियंता
श्री. सासणे यांनी चांगल्याप्रकारे करून घेतल्याने त्यांचेही यावेळी शिवसेना पदाधिकाऱयांनी व प्रवाशांनी अभिनंदन केले. यावेळी सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता श्री. मुल्ला व ठेकेदार श्री. देसाई उपस्थित होते.









