क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
तिरंगा स्पोर्ट्स क्लब कॅम्प आयोजित अमित मासेकर स्मृती चषक अखिल भारतीय सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेत अमित एफसी तिरंगा संघाने बबलू स्लॅमजर्स संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून अमित मासेकर चषक पटकाविला. विकी गॉटम याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
अमित मासेकर याच्या वाढदिवसानिमित्त कॅम्प येथील युनियन जिमखाना टर्फ मैदानावर आयोजित अखिल भारतीय सिक्स-ए-फुटबॉल स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये कोल्हापूर, हुबळी, मिरज, बेळगाव परिसरातील संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमित एफसी तिरंगा संघाने कोल्हापूर अ संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात अमिल बेपारी व विकी गॉटम यांनी गोल केले तर कोल्हापूरतर्फे रमेशने गोल केला.
दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात बबलू स्लॅमजर्स संघाने कोल्हापूर ब संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. बबलू स्लॅमजर्स तर्फे नजिम इनामदारने गोल केला. अंतिम सामन्यात अमित एफ सी तिरंगाने 1-0 असा विजय संपादन केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात अमित एफसी तिरंगा संघाच्या विकी गॉटमने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हाच निर्णायक गोल ठरला.
बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पवन मासेकर, जुबेर मतवाले, शाहिद बिस्ती आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या अमित एफसी तिरंगा संघाला 15 हजार रोख व चषक तर उपविजेत्या बबलू स्लॅमजर्स संघाला 8 हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू विकी गॉटम, स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू प्रशांत, स्पर्धेतील उत्कृष्ट संघ कोल्हापूर ब यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या अमित एफसी तिरंगा संघाने सर्वन बाळेकुंद्री या छोटय़ा बालकाला त्याच्या आजारासाठी 5 हजाराची मदत दिली. या स्पर्धेसाठी इम्रान बेपारी व मतिन इनामदार यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तिरंगा संघाच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.









