इतर जिह्याच्या मानाने रत्नागिरी जिल्हयाची स्थिती समाधानकारक
जान्हवी पाटील / रत्नागिरी
कोरोना संसर्गाच्या अधिकाधिक चाचण्या होऊन कोरोना ग्रस्तांवर त्वरित उपचार व्हावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे, या प्रयत्नांना मात्र जिह्यातील नागरिकांनी तितकिच चांगली साथ दिली म्हणूनच आज राज्यातील इतर भागापेक्षा रत्नागिरी तालुक्यात एकूण 2476 रुग्णांमध्ये केवळ 9 रुग्णांचे पत्ते व फोन नंबर चुकीचे आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी तरुण भारत शी बोलताना दिली.
सुरुवातीला कोरोना बाबत नागरिकांमध्ये समज गैरसमज होते, त्यामुळे शासकीय रुग्णालयात स्वब देण्यासाठी आलेल्या रुग्णांनी आपले खरे पत्ते व मोबाईल नंबर न देता चुकीचे पत्ते, नंबर दिल्याची बाब राज्यात अनेक जिह्यात समोर आली आहे अमरावती सारख्या जिह्यात तर तब्बल 747 पॉझिटिव्ह रुग्णांचे पत्ते, नावे, नंबर चुकीचे आढळून आल्याची माहिती नुकतीच आरोग्य विभागासमोर आली. असे प्रकार आणखीन काही जिह्यात सुद्दा घडले आहे मात्र रत्नागिरी तालुक्यात केवळ 9 रुग्णांनी पत्ते, नाव, फोन नंबर चुकीची देऊन दिशाभूल करण्याचा प्रयन्त केला आहे. जिह्यात आजपर्यंत एकूण 8476 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते यापैकी तब्बल 7947 रुग्ण बरे झाले आहेत.
रत्नागिरी जिह्यात साधारणपणे मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग चाचण्याला सुरुवात झाली, या आजाराविषयीचे गैरसमज व भीतीमुळे अनेक संशयित स्वब देण्यास कचरत होते.त्यावेळी मोबाईल वर ओटीपी येत असल्याने हा क्रमांक बरोबर असला तरी अनेकांनी चुकीचे नाव, पत्ता दिल्याने त्यांना शोधताना तालुका आरोग्य विभागाची थोडी धावपळ उडाली होती. तर काहींना चक्क पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्याची वेळ मध्यंतरी काळात आली होती.
पॉझिटिव्ह परिवारातील अनेकजण एकाचवेळी स्वब द्यायला येतात त्यामुळे एखाद्या चे नाव चुकीचे असले तरी त्याच्या अगोदर किंवा नंतरच्या व्यक्तीच्या सहाय्याने पॉझिटिव्ह ओळखण्याची कला आता आरोग्य यंत्रणेला अवगत झालेली आहे. काहींची नावे अर्धवट असल्याने स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ही संक्रमित रुग्ण शोधण्यास मोलाची मदत केली मात्र या लपाछपी च्या खेळात अनेकांना संसर्ग होणे आणि वेळेत उपचार नाही घेतल्याने प्रकृती गंभीर होण्याच्या घटना रत्नागिरी ही घडल्या.
आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि महसूल कर्मचारी यांच्या सतर्क मुळे आणि विशेषतः नागरिकांच्या जागरूकतेने जिह्यात चुकीच्या पत्त्यांचे प्रमाण कमी असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
यात विशेष उल्लेखनीय काम रत्नागिरी तालुका आरोग्य विभागांनी केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे पत्ते, नंबर शोधण्याची जबाबदारी जिह्यातील सर्वच तालुक्याने पार पाडली.









