प्रतिनिधी / विटा
क्रांतिसिंह कृषी महोत्सव शेतकऱयांच्या जीवनात बदल घडवेल. हे महोत्सव शेतकऱयांना मार्गदर्शक ठरेल, तालुकास्तरावरील कृषी प्रदर्शने शेतकऱयांना वरदान ठरतील, असे मत राज्याचे कृषी आणि सहकार मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
येथील मायणी रस्त्यावरील सुधाकर शहा मैदानावर कालपासून क्रांतीसिंह कृषी महोत्सवास सुरूवात झाली आहे. आज कृषी आणि सहकार मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी महोत्सवला भेट दिली. यावेळी कृषी आणि सहकार मंत्री डॉ. कदम बोलत होते. यावेळी संयोजक महेश खराडे, रविंद्र देशमुख, प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसिलदार ऋषीकेत शेळके, विजय गायकवाड, कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉ. कदम यांनी स्टॉलला भेट देत व्यावसायिक आणि शेतकऱयांशी संवाद साधला.
मंत्री डॉ. कदम म्हणाले, तालुकास्तरावर कृषी प्रदर्शन होणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महेश खराडे शेतकऱयांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञगन पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अशी प्रदर्शने शेतकऱयांना वरदान ठरत आहेत. क्रांतिसिंह कृषी महोत्सव शेतकऱयांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. प्रदर्शनाचा अधिकाधिक शेतकऱयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री डॉ. कदम यांनी यावेळी केले.
संयोजक महेश खराडे म्हणाले, शेतकऱयांच्या बांधापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळवण्याचे प्रदर्शन हे चांगले ठिकाण आहे. शेतकऱयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खराडे यांनी केले. यावेळी ऍड. गणेश देसाई, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्रअण्णा देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, राहुल जाधव, महेश जगताप, निखिल कारंडे, सुरेश पाचिब्रे, विनायक पाटील, प्रतिक म्हाळगे यांच्यासह शेतकरी, व्यावसायिक उपस्थित होते.
कृषी राज्यमंत्र्यांनी घेतली निर्यातक्षम द्राक्षांची माहिती
कृषी राज्यमंत्री विशवजीत कदम यांनी प्रदर्शनातील निर्यातक्षम द्राक्ष शेतीच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी द्राक्षाचा वाण, उत्पादन, निर्यात दर, त्यामध्ये येणाऱया अडचणी यांची सविस्तर माहिती घेतली. निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळींबाची शेती समोरील आव्हाने आणि संकटे याबाबत सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची मागणी महेश खराडे यांनी केली. त्यावर मंत्री कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.








