सहा महिन्यांपासूनचे थकलेले वेतन देण्याची मागणी : जि. पं. अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहे. आम्ही दिव्यांग असूनही सर्वसामान्य जनतेची कामे आजपर्यंत प्रामाणिकपणे केली आहेत. असे असताना बैलहोंगल, कित्तूर तालुक्मयातील दिव्यांग कर्मचाऱयांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांनी बुधवारी जिल्हा पंचायतसमोर धरणे आंदोलन करून तातडीने वेतन देण्याची मागणी केली.
सरकारच्या विविध योजना घरापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही केले आहे. याचबरोबर सरकारच्या आदेशानुसार इतर सर्व कामे आम्ही करत आहोत. असे असताना आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने प्रलंबित असलेले वेतन आम्हाला द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
जिल्हा पंचायतच्या अधिकाऱयांना निवेदन देऊन आपली कैफियत या सर्वांनी मांडली आहे. यावेळी चंद्राप्पा कैगेहळ्ळी, अशोक मुलीमनी, महांतेश सिदन्याळगोळ, हणमंत दळवाई यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.









