ऑनलाईन टीम / मुंबई :
टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुनमुन विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुनमुनने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने जातीवाचक शब्दाचा उल्लेख केला होता. ते वक्तव्य मुनमुनला आता महागात पडले आहे. व्हिडीओमध्ये मुनमुनने जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ता विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी हरियाणामधील हांसी शरहात मुनमुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘नॅशनल अलायंल फॉर दलित ह्यूमन राईटस’चे कार्यकर्ते रतज कलसन यांनी मुनमुन विरोधात गुन्हा दाखल केला होता.
अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मुनमुनवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुंबईत देखील मुनमुन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मुनमुन दत्ता लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला ** सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत होती. मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.









