ईडी कोठडीला सर्वोच्च न्यायालयाने ठरविले योग्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना कॅश फॉर जॉब घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए अंतर्गत नोंद गुन्ह्याप्रकरणी बालाजी यांच्या ईडी कोठडीला योग्य ठरविले आहे. तसेच याला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. सेंथिल बालाजी यांच्या पत्नीकडून न्यायालयात हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती. सेंथिल बालाजी यांनी रुग्णालयात घालविलेले दिवस ईडीच्या कोठडीत गणले जाणार नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
बालाजी यांच्या विरोधात तामिळनाडू परिवहन विभागात बस कंडक्टरांच्या नियुक्तीसह चालक अन् ज्युनियर इंजिनियरांच्या नियुक्ती प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने जून महिन्यात बालाजी यांना अटक केली होती.









