नदीत अडकलेल्या 10 जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविले
हैदराबाद / वृत्तसंस्था
तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. रस्ते आणि घरे पाण्यात बुडाली आहेत. अनेक रस्ते जलमय झाले असून लोकांना वाचवण्यासाठी हवाई दल आणि बचाव पथकाने अनेक भागात बचावकार्य सुरू केले आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिह्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे येथील चित्रावती नदीला पूर आला आहे. या पुरामुळे 10 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकले होते. याबाबत स्थानिक आमदार प्रकाश रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.
हवामान खात्याने चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लुवरसह तामिळनाडूच्या 16 जिल्हय़ांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नजीकच्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. संततधार पावसामुळे 19 जिह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तामिळनाडूत घर कोसळून 9 जणांचा मृत्यू
तामिळनाडूमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील वेल्लोर शहरात सकाळी घर कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या आठवडय़ात राज्यातील काही जिह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला होता. राजधानी चेन्नईतही पावसानंतर रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते.









