बेळगाव :/ प्रतिनिधी
शहरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे शांतता पसरली आहे. जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबरोबर शहरात उन्हाचा कडाका देखील चांगलाच वाढू लागला असून पारा 37.2 अंशांवर पोहोचला आहे.
गेल्या आठवडय़ात शहर व ग्रामीण भागात काही ठिकाणी पाऊस झाला होता. मात्र त्याला म्हणाला तसा जोर नव्हता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली असून बुधवारी शहराचा पारा 37 अंशांच्या पुढे पोहोचला होता.
कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. उन्हाळय़ाच्या तोंडावरच देशात कोरोनाने प्रवेश केल्याने जनतेला वाढत्या उष्म्याबरोबर कोरोनाशी सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे उन्हापासून थंडावा देणारी रसवंतीगृहे, शीतपेयगृहे बंद असल्याने अत्यावश्यक सेवा बजावणाऱयांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका व आशा कार्यकर्त्या भर उन्हात सेवा बजावत आहेत. मात्र बाजारपेठेसह इतर मार्गावर शरीरातील दाहकता कमी करणारी शीतपेये व इतर पदार्थ उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
उन्हाळय़ात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आईस्कीम, ज्युस यासारख्या शीतपेयांकडे नागरिकांचा कल वाढलेला असतो. मात्र सध्या कोरोनामुळे हे सर्व बंद असल्याने बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची शीतपेयाविना गैरसोय होत आहे. एकूणच उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.









