ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेगाने वाढणारा आकडा धडकी भरवणारा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात आरोग्य सचिवांनी राज्यांना तात्पुरती रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आणि प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जिल्हा / उपजिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून कोविड संबंधित आरोग्य पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाटय़ाने वाढत असून, भविष्यात आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये समस्या निर्माण होऊ नये, या हेतूने राजेश भूषण यांनी सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.