प्रतिनिधी / चिपळूण :
चिपळुणात दुसरा कोरोनाग्रस्त सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा रूग्ण तळसर या आपल्या गावात गेला नसला तरी गावातील त्याचा भाऊ, मेहुणा, कामथे, सावर्डे येथील चहावाला, दारूविपेता व पोलीस असे तब्बल 50जण त्याच्या संपर्कात आले आहेत. दोन नातेवाईक संपर्कात आल्याने गावात भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तरूणांचे खास पथक नेमून येणाऱया-जाणाऱयांची नोंद करण्यास सुरूवात केली आहे.
आठवडाभरात तालुक्यात दुसरा कोरोना रूग्ण सापडला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह तालुक्यातील जनतेमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित रूग्ण 2 मे रोजी मुंबईतून येथे आला होता. त्याने काही वाहनांचा आधार घेत चिपळूण गाठले. येथे आल्यानंतर त्याने गावठी दारू ढोसली. तिचे प्रमाण अधिक झाल्याने तो विंध्यवासिनी परिसरात रस्त्यावरच पडला होता. गस्तीच्या पोलिसांनी त्याला कामथे रूग्णालयात दाखल केले. काही वेळातच त्याने तेथून पलायन केले आणि थेट चालतच सावर्डेत पोहचला. याचदरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने आपण सावर्डेत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला पोलीस स्थानकात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार तो पोलीस स्थानकात गेला. मात्र तो दारूच्या अंमलाखाली असल्याने सावर्डे पोलिसांनी त्याच्या भाऊ व मेहुण्याला सोबत घेत त्याला पुन्हा कामथे येथे भरती केले. त्यानंतर त्याला पेढांबे येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्यातील काही लक्षणे कोरोनाशी संबंधित असल्याचे दिसून आल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले व कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले.
गावात या कारणाने भीती
संबंधित रूग्ण धनगरवाडीतील आहे. तो या वाडीत गेला नसला तरी त्याला सावर्डे येथे उचलून वाहनात भरणारे त्याचे भाऊ व मेहुणा वाडीत गेले. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. या दोघांचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. या 230 लोकसंख्येच्या या वाडीत 24 घरे असून 30 कुटुंबे आहेत.
50 जण होमक्वारंटाईन
संबंधित कोरोनाग्रस्त हा मद्यपी असून अनेक वर्षापासून मुंबई व्हीटी-चर्चगेट येथे रस्त्यावर राहत होता. चिपळुणात आल्यावर तो तब्बल 50 जणांच्या संपर्कात आला असल्याने या सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
कुडप येथे लग्नाला गेल्याची चर्चा
हा कोरोनाग्रस्त गावाकडे आल्यानंतर फिरत फिरत कुडप येथे धनगर समाजाच्याच पार पडलेल्या एका लग्न समारंभाला गेल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलीस याची चौकशी करीत आहेत.
ग्रामस्थांनी नेमले पथक
तळसर ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावात तरूणांचे खास पथक नेमले असून ते गावात येणाऱया व जाणाऱया व्यक्तींच्या नोंदी करीत आहेत, अशी माहिती सरपंच सरिता सावंत व तटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू खेतले यांनी सांगितले.
धनगर समजाचे दूध नाकारले
कोरोनाग्रस्त ज्या धनगर समाजाचा आहे, त्या समाजाचा दुग्ध व्यवसाय आहे. त्यामुळे या लोकांकडून एका डेअरीवर येणारे दूध नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे.
…अन् त्याचे नेटवर्क गेले!
तळसर-मुंढे परिसरात कोणत्याच कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुळे नेटवर्कसाठी धनगरवाडी गाठावी लागते. मात्र वाडीत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांचे नेटच गायब झाले आहे.
अधिकाऱयांची बैठक
गुरूवारी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सरिता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांची बैठक घेतली. त्यात अनेक विषयांवर चर्चा करून सध्यातरी गाव आयसोलेट न करण्याचा निर्णय घेतला. मात्र तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.









