तलाठय़ाच्या वेतनातून 25 हजार रक्कम न्यायालयात जमा, तलाठय़ाच्या कारभारामुळे संताप, तहसीलदारांनाही कारणे दाखवा नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
सावगाव येथील जमिनीच्या सात-बारा उताऱयावर बेकायदेशीर नावे दाखल करण्यात आली. त्याबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मागविण्यात आली होती. मात्र ती माहिती देण्यास तलाठय़ाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे त्या तलाठय़ाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने तलाठय़ाला 25 हजार रुपये दंड ठोठावला. मात्र तो दंडही देण्यास टाळाटाळ केल्यामुळे न्यायालयाने तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तलाठय़ाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तहसीलदारांच्या अंगलट आला आहे. यामुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. पाठीशी घालणाऱया तहसीलदारालाही न्यायालयाने दणका दिल्याने याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
सावगाव येथील के. वाय. घाटेगस्ती आणि राजू घाटेगस्ती यांच्या जमिनीच्या उताऱयामध्ये फेरफार करण्यात आला होता. त्यासंदर्भातील कागदपत्रे ऍड. लक्ष्मण पाटील यांनी मागितली. मात्र ती कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे वकिलांनी आरटीआयअंतर्गत त्याची माहिती मागितली. मात्र माहिती देण्यास तलाठी दयानंद कुगजी यांनी टाळाटाळ केली. त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली. त्या ठिकाणी न्यायालयाने दि. 28 जानेवारी 2021 रोजी 25 हजार रुपये दंड ठोठावला होता.
त्यानंतरही तलाठी दयानंद कुगजी यांनी ती रक्कम दिली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केला म्हणून तहसीलदारांना 20 जुलै 2021 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सावगाव येथील यशवंत व रामचंद्र घाटेगस्ती यांची जमीन समान वाटणी झाली होती. मात्र के. वाय. व राजू घाटेगस्ती यांचे नाव कमी करून त्यामध्ये रामचंद्र घाटेगस्ती यांचे नाव दाखल केले. त्यानंतर रामचंद्र घाटेगस्ती यांनी आपला मुलगा सुनील घाटेगस्ती याला बक्षीसपत्र केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मूळ मालक मयत के. वाय. घाटेगस्ती यांनी आणि त्यांच्या भावांनी न्यायालयात धाव घेतली.
तलाठी दयानंद कुगजी यांनी यासंदर्भातील कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आरटीआयअंतर्गत ही कागदपत्रे मागविली होती. आरटीआयअंतर्गत कागदपत्रे मागूनही देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे तहसीलदारांनी तलाठी दयानंद कुगजी यांच्या वेतनातून 25 हजार रुपये वसूल करून दंड न्यायालयात भरला. एकूणच या प्रकारामुळे खळबळ उडाली असून तहसीलदार व तलाठय़ांचा कारनामा उघडकीस आला आहे.