मी मिरजकर फाउंडेशन आणि व्यापाऱ्यांचा इशारा
प्रतिनिधी/मिरज
जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला मिरजेतील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. सोमवार पासून कोरोना नियमावलीचे पालन करून सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरीही प्रशासनाने दुकाने बंद केली. हा व्यापाऱ्यांवर अन्याय असून, त्या विरोधात मंगळवारी व्यापारी, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरून शासकीय कार्यालायमांध्ये घुसतील, असा निर्णय झाला असल्याची माहिती मी मिरजकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर खाडे यांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी मिरज शहरातील व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने उघडली होती. प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता असल्याने परिसरात तणाव होता. मी मिरजकर फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि व्यापारी संघटित झाले होते. कारवाई करण्यास आलेल्या पथकाला जाब विचारला जाणार होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आणि शहर पोलिसांनी व्यापाऱ्यांची दुकांने बंद केली. त्यानंतर मात्र व्यापारी संतप्त झाले. मी मिरजकर फाऊंडेशन आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली. लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंड करण्यासह कामगार आणि कुटुंबियांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे सुधाकर खाडे यांनी सांगितले.