शेतीकर्जाची व्याजमाफी करून पुनर्रचना करावी , ट्रान्सफॉर्मरची कनेक्शन तोडल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपतोय
सांगली / प्रतिनिधी
अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे कोटयवधीचे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा काळात शेतकऱयांना मदत करण्याऐवजी विमा कंपन्यांनी अडवणुकीचे धोरण घेतले असून भरीसभर म्हणून महावितरण कंपनीनेही ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला असून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला.
राज्य शासनाने शेती कर्जाचे व्याजमाफी करून कर्जाची पुनर्रचना करावी अशी मागणी करून खा. पाटील म्हणाले, यापुर्वी वर्षातून दोन तीन वादळे होत. पण अलिकडच्या काळात वर्षात 50 हून अधिक वादळे होऊ लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळींब, भाजीपाल्यासह शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने अद्याप पंचनाम्यांचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल आणि संतप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असल्याचे सांगून खा. पाटील म्हणाले, विमा कंपन्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱयांचे पैसे भरून घेतले. पण भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकरी विमा भरण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सध्या जिल्ह्यात बहुतांशी द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱयांच्या अडवणुकीचे धोरण घेतले आहे. राज्य शासनाने या विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारनेही यामध्ये आपला वाटा उचलावा. शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण शेतकऱयांबरोबर राहून तीव्र आंदोलन उभा करू, असा इशाराही त्यांनी दिला.
महावितरण कंपनी वीज थकबाकीमुळे अडचणीत आली आहे. ही जरी वस्तुस्थिती असली तरी शासनाने कृषी बिलासंदर्भात धोरण ठरविण्याची गरज आहे. असे न करता शेतकऱयांचे थेट ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱयांचा संयम सुटत चालला असून ग्रामिण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबर रहावे लागेल, असा स्पष्ट इशाराच खा. पाटील यांनी यावेळी दिला.
एस. टी. कर्मचाऱयांच्या संपामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थी सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. या संपामुळे आता एस. टी. आणि कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती संपत चालली आहे. त्यामुळे शासन आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयातून संपावर तोडगा काढावा, अशी मागणीही खा. पाटील यांनी यावेळी केली.








