ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, मृतांच्या आकड्यात देखील वाढ झाली आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे राज्यात
लॉकडाऊनची शक्यता अजूनही टळलेली नाही; त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लादण्यात येतील. उद्या परवा याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल आणि तरी देखील रुग्ण संख्या कमी झाली नाही तर महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केले जाईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
कोरोनाच्या संकटात परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घाबरु नका, असे आवाहन केले.
पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनची शक्यता पूर्णपणे अजूनही टळलेली नाही. मार्च महिन्यापासून कोरोना आक्राळ विक्राळ वाढत आहे. कोरोनाने नवा अवतार धारण केला आहे. ही भीती मी मागे ही व्यक्त केली होती.
- एप्रिल अखेरपर्यंत संयम बाळगा
मधल्या काळात आपण शिथिल झालो. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणत वाढल्याने हा प्रादुर्भाव आणखी वाढला. एप्रिल अखेरपर्यंत संयम बाळगा, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झाले, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचे नाही. मला कुणी व्हिलन ठरवले, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन.
- लस घेतली तरी मास्क अनिवार्य
पुढे ते म्हणाले, बऱ्याच लोकांनी लस घेतली आहे तरी देखील त्यांना कोरोना झाला आहे. पण हे का झाले याचा पण विचार करायला हवा. लस घेतली तरी मास्क घालणे अनिवार्य आहे. कारण लसीकरणानंतर संसर्ग कायम आहे.
लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. रुग्णवाढ ही सध्या झपाट्याने होत आहे. राज्यात 17 सप्टेंबर 2020 रोजी 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 1 एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा 31 हजार मृत्यू होते. आता 54 हजार 900 च्या आसपास रुग्ण झाले आहेत. तेव्हा एका दिवशी 24 हजार रुग्ण आढळले होते. 1 एप्रिलला 43 हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर 15 ते 20 दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. त्याही वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयुचे बेड वाढले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढणार? हाच खरा चिंतेचा विषय आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.