मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा इशारा : दोड्डबळ्ळापूर येथे मेक शिफ्ट इस्पितळाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात आर्थिक व्यवहार व जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. लोकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास संसर्ग पुन्हा वाढेल. परिस्थिती कठीण झाल्यास पुन्हा कठोर निर्बंध जारी करणे अनिवार्य होईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. दोड्डबळ्ळापूर येथे खासगी कंपन्यांच्या सीएसआर (सामाजिक कल्याण) अनुदानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 70 बेड्स क्षमतेच्या मेक शिफ्ट इस्पितळाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
कोरोना परिस्थितीमुळे व्यापार करणे शक्मय न झाल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रयत्नांती सरकारने कठोर निर्बंध शिथिल केले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगून कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे. अन्यथा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे कठोर निर्बंध लागू करणे अनिवार्य ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे आदी नियमांचे पालन करून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा सध्या जारी करण्यात आलेली पंधरा दिवसांची शिथिलता रद्द करून पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची परिस्थिती निर्माण होईल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सर्वांचे सहकार्य मिळाले तर कोरोनाविरुद्धची तिसरी लाट थोपविणे शक्मय होईल. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सर्वांनी सरकारला सहकार्य करावे. तेव्हाच कोरोना महामारीपासून मुक्त होणे शक्मय होईल. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्व पायाभूत सुविधा वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. देशात पहिले मेक शिफ्ट हॉस्पिटल निर्माण करून कर्नाटकाने आदर्श निर्माण केला आहे. दोड्डबळ्ळापूर येथे निर्माण करण्यात आलेल्या मेक शिफ्ट हॉस्पिटलमुळे ग्रामीण भागातील जनतेला कोरोनावरील उपचार घेणे शक्य होणार आहेत. डॉक्टरांना ग्रामीण वैद्यकीय सेवेसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले.









