माजी आमदार प्रमोद जठार यांचा इशारा
वार्ताहर/ राजापूर
तालुक्यात होऊ घातलेला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा आर्थिक कायापालट करून टाकण्याची क्षमता असलेला प्रकल्प आहे. मात्र रिफायनरी होणार नाही, ही काळय़ा दगडावरची रेषा म्हणणाऱया मंत्री उदय सामंत यांनी तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, हे लक्षात ठेवावे. तुम्ही सात पिढय़ांची गडगंज संपत्ती कमवायची आणि जनतेने मात्र पिढय़ान्पिढय़ा दारिद्रय़ातच कंठावे. असे अविचाराने वागाल तर जनता ते सहन करणार नाही. जनताच तुमचे सरकार राजापूरच्या समुद्रात बुडवेल, असा इशारा माजी आमदार व भाजपा नेते प्रमोद जठार यांनी प्रकल्पविरोधक शिवसेना नेत्यांना दिला आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कधीच पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार नाही, ही काळय़ा दगडावरची रेष आहे, असे विधान नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी वरील इशारा दिला आहे. दिड ते ते दोन लाख लोकांना रोजगार देण्याची ताकद आणि रोजगाराच्या अप्रत्यक्ष लाखो संधी देणारा रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र त्याला वैयक्तिक इगोच्या राजकारणातून नाकारणारे मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत हे कोकणच्या नशिबाचे भोग आहेत, अशी खरमरीत टीका जठार यांनी केली. कोरोनानंतरची बेरोजगारीची स्थिती भयानक आहे. कोकणच्या पिढय़ा रोजगारासाठी मोठय़ा शहरात स्थलांतरित झाल्या होत्या. आता कोकणात परतणाऱया नव्या पिढय़ा तुमचे काळय़ा दगडावरचे नकार स्वीकारायच्या मनस्थितीत नाहीत. दुर्देवाने कोकणातून निवडून आलेले हे खासदार आमदारांसारखे काळे दगड आता कोकणच्या समुद्राच्या तळाशी कायमसाठी फेकले जातील हे लक्षात घेऊन विधाने करा, असा इशारा यावेळी बोलताना जठार यांनी दिला. आपण शेकडो कामांची कंत्राटे स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर घेत गडगंज संपत्ती कमवायची, नैतिक-अनैतिकतेची चाड न बाळगता मुंबई, पुण्यात ऐशोआरामात जगायचे आणि बेरोजगारवर्गाला संधी देणारे प्रकल्प स्वतःच्या ईगोपायी नाकारत जनतेला भिकारीच ठेवायचे, हे यांचे उद्योग आता जनता अजिबात सहन करणार नाही, असा इशारा देत जठार यांनी प्रकल्पविरोधक शिवसेना नेत्यांचे कान टोचले.
काळय़ा दगडावरची पांढरी रेषा समजा!
अजूनही केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पासाठीचा 2 महिन्यांचा अल्टीमेटम आहे. राजापूरकर स्थानिक जनता विनयपूर्वक हा प्रकल्प इथेच व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालत आहे. 8 हजारपेक्षा अधिक एकर जमीन स्वेच्छेने प्रकल्पासाठी देत आहे. तुमचा नकार जर असाच कायम र<ाहिला तर हा प्रकल्प राजापूर येथे झालाच पाहिजे, यासाठी लवकरच कोकणी जनता महाजनआंदोलन उभे करेल. तुम्हाला रिफायनरी नको तर आम्हाला शिवसेना नको. काळय़ा दगडावरची पांढरी रेषा समजा. त्याचा प्रत्यय नजीकच्या राजापूर-लांजा विधानसभा निवडणुकीतील निकालावरून येऊ लागला असेलच, असा सणसणीत इशारा प्रमोद जठार यांनी दिला आहे.
.









