मूर्ती शाळांमध्ये लगबग : गणेशमूर्ती पॅकिंग करून पाठविण्याच्या कामाला वेग
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायाच्या आगमनासाठी अवघा दीड महिना शिल्लक राहिला असल्याने गणेशभक्तांमधून जय्यत तयारी केली जात आहे. मूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू असून, घरगुती गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. बाहेरच्या जिल्हय़ांमध्ये पाठविल्या जाणाऱया गणेशमूर्ती पॅकिंग करून त्या त्या गावी पाठविण्याच्या कामाला वेग आला आहे.
विघ्नहर्ता गणराया भक्तांच्या घरी गणेश चतुर्थीला विराजमान होतो. बेळगावसह आसपासच्या भागात मोठय़ा उत्साहाने गणेश चतुर्थी साजरी होते. मागील वषीप्रमाणे यावषीही गणेशोत्सवावर कोरोनाचे काळे ढग असले तरी यातूनही गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. विघ्नहर्ता गणराया कोरोनाचे संकट दूर करून घरात प्रवेश करील, अशी आशा प्रत्येकालाच असल्याने गणराय येण्याची वाट पाहू लागले आहेत.
बेळगाव परिसरातून अनेक गणेश मूर्ती गोवा, धारवाड, गदग, विजापूर या परिसरात पाठविल्या जातात. त्यामुळे या गणेश मूर्तींचे काम पूर्ण झाले आहे. याच सोबत शहरातही गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.









