अध्याय बाविसावा
उद्धव भगवंतांना म्हणाला, तू निजात्मरूपी परमेश्वर आहेस. तुला जाणण्यासाठी मोठमोठय़ा ऋषींनी नानाप्रकारचे तर्क चालवून तत्त्वविचार सांगितला आहे. तू तर एकच तत्त्व आहे असे सांगितले आहेस. ऋषि म्हणतात ती अनेक आहेत. तेव्हा यातील निश्चितार्थ मला सांगावा. उद्धवाच्या प्रश्नावर भगवंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, उद्धवा, मोठमोठय़ा ऋषींनी जी तत्वे सांगितली आहेत ती सारी खरीच आहेत. हे सर्वज्ञ ज्ञात्यांना माहीत आहे. ज्याचे ज्ञान जसे असते, त्याप्रमाणे तो तत्त्वे सांगत असतो. हे लक्षात घेऊन ऋषी बोलतात तेही खरेच समजावे. आता सारीच मते जर खरी असं म्हणायचं झालं, तर कोण चूक? कोण बरोबर हे ठरवण्याचं कामच उरत नाही असे मात्र उद्धवा! तू म्हणू नकोस. मी असं म्हणतोय त्यामागचं हृद्गत मी तुला सांगतो ते ऐक. माझी माया अघटित घटना करणारी आहे. हरिहरालासुद्धा तिचे आकलन होत नसते. कारण ती नसलेली सृष्टि वाढवून त्रिभुवनाला भुरळ पाडते.
तिला हाताशी धरून महर्षि आपल्या मताने जे जे काही बोलत असतात, ते ते तेथे खरेच असते. दोरच जेथे सापाच्या आकरासारखा भासतो, तेथे तो साप पांढरा, काळा, की तांबडा कसला म्हणावा? कारण ज्याला जसा भ्रम होतो, तसा तो त्याला दिसत असतो.
त्याप्रमाणे आत्मतत्त्व हे एकच आहे व ते निर्गुण व निर्विकार आहे परंतु मायेमुळे ब्राह्मण अनेक तत्त्वांचे प्रतिपादन करतात.
त्यांचे भाषण मायामयच असते. आपल्या मताच्या पुष्टय़र्थ ते नानाप्रकारे वाग्वाद करतात. ते वाद कसे असतात तेही तुला सांगतो ऐक. असे म्हणून श्रीकृष्ण यथार्थ तत्त्वविचार उद्धवाला सांगू लागले. ते म्हणाले, विद्वान घालत असलेल्या वादाचे सर्वसाधारण स्वरूप असे असते. प्रत्येकजण दुसऱयाला म्हणतो की, हे तुम्ही जे म्हणता, ते बरोबर नाही. मी जे सांगतो, तेच बरोबर आहे. अशा बोलण्यातून वादाला सुरुवात होते. हा सोडवण्यास कठीण वाद त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. माझ्या मायेचे बळ मोठे दांडगे आहे. त्यायोगे प्रचंड अभिमान उत्पन्न होतो. त्यामुळे विद्वान् लोक युक्तिप्रयुक्तीचे वाग्जाळ माजवून वितंडवाद घालीत बसतात. त्यांचा शास्त्रश्रवणाभिमान मोठा असतो. ‘तू सांगतोयस ते बरोबर नाही, मी म्हणतो हेच खरे आहे, ह्याला माझ्याजवळ ग्रंथाधार आहे’ असे ते म्हणतात. सत्वरजादि गुण माझ्या मायेला अनंत शक्ती प्राप्त करून देतात. त्रिगुणतील रज, तम गुण क्षुब्ध झाले म्हणजे ते वादविवादाला चालना देतात. या चालनेमुळे विद्वान आपलेच मत खरे अशा अभिमानाने आपापसात तंडत बसतात! गुणांच्या उदेकाने झालेला अभिमान मनात खूप विकल्प उत्पन्न करतो आणि अतिवाद करून त्या विकल्पाचे हिरीरीने समर्थन करतो. म्हणून माणसाने सत्व वृत्ती वाढवावी म्हणजे रजाचा आणि तमाचा ऱहास होऊन ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यामुळे शम आणि दम म्हणजे सहनशीलता आणि समाधानी वृत्ती यांचा उत्कर्ष होतो. ह्या शमदमाचा प्रभावच असा आहे की, सूर्योदय झाल्याबरोबर अंधकार नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे विकल्पासहवर्तमान संकल्प व वादप्रतिवाद आपोआपच बंद पडतात. शमदमाचा उत्कर्ष झालेले ज्ञाते नानाप्रकारच्या मतांचा विचार करून त्यातील हृद्गत जाणतात. त्यासाठी आवश्यक आत्मनि÷ा त्यांनी प्राप्त करून घेतलेली असते. ते यथोक्त रीतीने गुरूपाशी शास्त्रपाठ घेऊन आत्मनि÷ा साध्य करीत असतात. ते असल्या वादात कधीच पडत नाहीत. तू विद्वानांनी सांगितलेल्या तत्त्वांची संख्या निरनिराळी कशी असे विचारले होतेस त्याचे कारण सांगतो. तत्त्वे एकापासून एक उत्पन्न होतात ह्याला परस्परांचा ‘अनुप्रवेश’ म्हणतात.
उदाहरणार्थ सदा सत्य बोलावे हे प्रमुख तत्व पण सत्य बोलून एखाद्यावर अन्याय होत असेल तर सत्य बोलताना तारतम्य बाळगावे हे त्यातून निर्माण झालेले उपतत्व असे लक्षात घे. तत्त्वापासून तत्त्वे उत्पन्न होतात ती अशी. तत्त्वांची संख्या ही अशी वाढत जाते. जेव्हढी उपतत्वे जास्त तेव्हढी तत्वांची संख्या जास्त असते.
क्रमशः