कोणत्याही व्यवसायाचे व्यवस्थापन यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने होण्याकरिता काही तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असते.
श्रमविभागणी : कार्याचे योग्य विभाजन करून प्रत्येक कृती एका किंवा अनेक कर्मचाऱयांकडे सोपविल्यामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत बरीच वाढ होते. कार्याचे विभाजन केल्यामुळे विशेषीकरणाला वाव मिळतो व उत्पादकता वाढते.
अधिकार व जबाबदारी : संघटनेत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला अधिकार दान करणे आवश्यक असते. आवश्यक त्या अधिकाराशिवाय कोणालाही जबाबदारी पार पाडणे शक्मय नाही. अधिकार व जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यात संतुलन टिकवून ठेवणे, हे व्यवस्थापनाचे काम असते.
शिस्त : व्यवस्थापनात सर्व कर्मचाऱयांकडून शिस्तबद्ध आचरणाची अपेक्षा असते. शिस्तबद्ध संघटना चांगले काम करू शकते. संघटनेत शिस्त जोपासणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते.
सर्वसामान्य हिताला प्राधान्य : संघटनेत व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असते. कोणताही निर्णय घेताना संघटनेचे हित महत्त्वाचे आहे, हे व्यवस्थापनाने नजरेआड करून चालणार नाही. व्यक्तिगत हिताला प्राधान्य दिल्यास कामगारांत मतभेद निर्माण होऊ शकतात.
वेतन : कर्मचाऱयांना मिळणारा मोबदला व कर्मचाऱयांचे समाधान, कार्यक्षमता व उत्पादकता यांच्यामध्ये जवळचा संबंध असल्याने प्रत्येकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदला व्यवस्थापनाने दिला पाहिजे.
केंद्रीकरण : संघटनेत योग्य स्तरावर अधिकाराचे केंद्रीकरण केल्यामुळे व्यवस्थापनाच्या क्षमतेचा महत्तम उपयोग करून घेता येतो. किती प्रमाणात अधिकाराचे केंद्रीकरण वा विकेंद्रीकरण करावे, हे संघटनेचा आकार, स्वरूप व अधिकाऱयांची क्षमता यांवर अवलंबून असते.
अधिकार-साखळी : (स्केलर चेन) व्यवस्थापनात वरि÷ अधिकाऱयापासून कनि÷ अधिकाऱयांपर्यंतचे संबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने अधिकार-साखळी निर्माण करणे आवश्यक असते. या साखळीमुळे अधिकारकक्षा निश्चित होतात व कोणी कोणास जबाबदार राहावे हे निश्चित होते. अधिकार-साखळीमुळे व्यक्तींमधील परस्परसंबंध व संप्रेषण सुनिश्चित व सुलभ होते आणि कार्यपूर्ततेतील गतिमानता वाढते.
क्रम :संघटनेत प्रत्येक व्यक्तीला, तसेच प्रत्येक वस्तूला जसा क्रम योजून दिलेला असतो त्यानुसार तिचे निश्चित स्थान असते. फेयॉलने त्याची विभागणी वस्तुक्रम (मटेरियल ऑर्डर) व सामाजिक क्रम (सोशल ऑर्डर) अशी केली आहे. ‘प्रत्येक वस्तूला (व्यक्तीला) तिचे असे निश्चित स्थान आणि प्रत्येक वस्तू (व्यक्ती) तिच्या योग्य स्थानी’ हे सूत्र या क्रमव्यवस्थेत अवलंबले जाते. या तत्त्वामुळे योग्य माणसे योग्य कामाकरिता नेमली जाऊ शकतात व कार्यक्षमता वाढू शकते.
समानता : कामगारांमध्ये भेदभाव न करता जर त्यांना समानतेने वागवले, तर कामगार व व्यवस्थापन यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि कामे यशस्वीपणे पार पडू शकतात.
नोकरीतील स्थैर्य : संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱयाला नोकरीचे स्थैर्य असेल, तर तो आपले कार्य अधिक रस घेऊन कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अस्थिर कामगारवर्ग हे व्यवस्थापनाचे अपयश मानले जाते.
पुढाकाराची भावना : कामगारांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रोत्साहन देणे व त्यांच्यामध्ये पुढाकाराची इच्छा जागृत करणे, हे व्यवस्थापनाचे काम असते. व्यवस्थापनाने जर योग्य त्या प्रेरणा दिल्या, तर कर्मचारी आपल्या सुप्त शक्तीचा उपयोग करून उत्पादनाचे प्रमाण वाढवू शकतात.
एकी हेच बळ : (संघभाव) सर्व कामगारांत जर एकीची भावना असेल, तरच उत्पादकता व उत्पादन वाढू शकते. व्यवस्थापनकार्य हे सामूहिक व संघटित प्रयत्नांचे फळ असते.