कोरोना काळात सीपीआरने अनुभवला थरार
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
धाप लागलेला पेशंट.. त्याला घेऊन येणाऱया ऍम्ब्युलन्स.. सीपीआरमध्ये झटकन् वळतात.. स्ट्रेचरवरून रूग्ण वॉर्डमध्ये.. बेडसाठी धडपड.. व्हेटिंलेटरची प्रतिक्षा.. हायरिस्क होताच.. दूधगंगातील चौथा मजला.. अपर कोरोना...' नाव ऐकूनच धडकी.. अन् चढत्या रात्रीसोबत.. वाऱयासह घोंघावणारा मृत्यू... हातापायांची धडपड.. अन् सारं काही शांत.. वैद्यकीय स्टाफचे शर्थीचे प्रयत्नही व्यर्थ... तो गेल्याची मिळणारी माहिती अन् नीरव शांततेत उमटणारे हुंदके.. सीपीआर परिसराने ही स्मशानशांतता अन् वैद्यकीय स्टाफसह रूग्ण, नातेवाईकांचा केंडमारा कोरोना काळात अनुभवला..आता मात्र त्याची दाहकता कमी होतेय...! सीपीआर मार्चमध्ये कोरोना आयसोलेटेड झालं अन् नॉन कोरोना रूग्णांना घेऊन रात्रभर रूग्णवाहिका बाहेर धावू लागल्या.. अन् हळूहळू साडेसहाशे बेडचे हॉस्पिटलकोरोना’मय झालं. उभारलेले तीन-चार तंबू.. नोंदणीसाठीची रांग.. परिसरात लागलेल्या वाहनांच्या रांगा.. अन् बॅरिकेडस्.. त्यातून सुरू असलेली डॉक्टर्स, वैद्यकीय स्टाफची धावाधाव.. अन् संशयित रूग्णांच्या ऍम्ब्युलन्स.. जीवन-मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष पाहणारे डोळे.. पीपीईकीटमधील स्टाफच्या चेहऱयावर लपलेला तणाव.. मर्यादित व्हेटिलेटर अन् ऑक्सिजन बेडने वाढवलेली धाकधुक… सारं रात्रीस खेळ चाले..'चं दर्शन घडवणारं...! जिल्हा़लॉकडाऊन’ झाला, पण `सीपीआर’चं श्वास सुरूच होता.. राहिला.. पाहता पाहता सहा महिने उलटले.. अन् तणाव कमी होऊ लागला.. कोरोनानं दिलासा दिला.. पण जाताना ट्रॉमा केअरमध्ये त्याने पहाट जागवलीच.. साखरझोंपेची सुरूवात अन् मोठा आवाज.. झोंबणारा उग्र दर्प अन् धुरमय वॉर्ड… हायरिस्क रूग्णांची घुसमट.. समोर झडपेसाठी टपलेला मृत्यू अन् जगण्यासाठीची धडपड.. धावत येणारी सिस्टर.. वाजलेला सायरन.. अन् क्षणार्धात शांततेनंतरची धावपळ.. वैद्यकीय स्टाफ.. रूग्णांना नेणारे स्ट्रेचर..त्यावर ठेवलेल्या सलाईन अन् कुत्रिम श्वास रूग्णाला देत धावणारे डॉक्टर…अग्निशमन गाडी पोहोचते..अधिकारी पोहोचतात अन् सकाळ होताच… रात्री काहीच घडलं नाही..अशा आर्विभार्वात पुन्हा सुरू असलेली सीपीआरची गाडी…
सीपीआरमधील संशयित, अत्यवस्थ.. धाप लागलेल्या रूग्णांची तळमळ.. त्यांना दिलासा देणारे पण मनातून छिन्नविछिन्न झालेले त्यांचे कुटुंबिय..प्रशासनाचे बांधलेले हात..अन् किती जणांना समजवायचे.. यातून वैतागलेले तरीही शांत चेहरे.. अगदी ओपीडीत डोळÎांसमोर धास्तीने रूग्णांनी सोडलेले प्राण.. त्यांच्या शेवटच्या हाका अन् धापा…वॉर्डमध्ये नेल्यानंतर येणारी स्मशानशांतता.. शेजारील बेडवरील तगमगलेला रूग्ण.. पलीकडील हातपाय बांधलेल्या रूग्णांची सुटकेसाठी धडपड अन् क्षणार्धांत ताठलेले पाय.. अन् वळलेली मान.. सुटला एकदाचा.. डॉक्टरांची तपासणी सुरू.. थांबलेले हृदय अन् तेथेच कागदपत्रांची पुर्तता करत पिशवीबंद होणारा मृतदेह.. दारात लागलेली शववाहिका अन्.. अखेरच्या दर्शनापासून वंचित झालेले, हुदक्यांवर हुंदके देणारे चेहरे…
दूधगंगा..चा चौथा मजला..अपर कोरोना वॉर्डमध्ये हायरिस्क अन् कोमॉर्बिड रूग्ण.. त्यातील कित्येकांचे सर्वच कुटुंबिय कोरोंटाईन..पहायला कोणीच नाही.. एखादं दुसरा नातेवाईक… तोही कॉरीडॉरमध्ये.. डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या प्रतिक्षेत..वॉर्डमध्ये मध्यरात्री घोंघावणारा वारा.. अन् वाढत जाणारा तणाव.. ऐकू येतेय.. फक्त तगमग.. अचानक एकाचा श्वास कोंडतो.. क्षणार्धात सारं काही संपतं. त्याचा मृत्यू पाहणारे डोळे.. अन् त्यालाही बसलेला धक्का. क्षणार्धात डोळÎांतून ओघळणारं पाणी.. अन् सारं शांत.. सप्ताहाची सोबत अनुभवणारा वृद्ध. डॉक्टरांना साद घालतोय.. तोपर्यत तिसराही गेला… अन् पाहणाऱया चौथ्यानेही पांडुरंगाला साद घालत मिटलेले डोळे..
डॉक्टरांचा फोन.. मुलगा धावत येतो.. मृतदेह आणण्यासाठी अपर कोरोनात जातोय. समोरच दृश्य पाहून तोही स्तब्ध.. वॉर्डमधून तीन मृतदेह खाली येतात.. पण चौथा तेथेच.. कुटुबीय, नातेवाईकांच्या प्रतिक्षेत.. कोरोंटाईन.. येणार नाहीत. म्हटल्यांवर वॉर्डंबॉयच साथीने तोही मृतदेह शववाहिकेत येतो.. चार मृतदेहांना घेऊन पांढरी शववाहिका बाहेर पडते.. अंगावर काटा येणारं हे दृश्य.. पण सीपीआरनं अनुभवलं..
गेली सहा महिने सीपीआरमधील रात्री अशा जागल्या..
Previous Articleरत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह
Next Article सांगली जिल्ह्यात 509 कोरोनामुक्त तर नवे 298 रूग्ण









