प्रतिनिधी / बेळगाव
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करताना तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण त्याच्या आहारी जाता कामा नये, असे मत मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी व्यक्त केले. काकडे फौंडेशन आणि साप्ताहिक वीरवाणी आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस ई-वक्तृत्व स्पर्धेच्या समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
बालिका आदर्श विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उद्योजक गोविंद फडके, वीरवाणीचे संपादक लक्ष्मण पवार व काकडे फौंडेशनचे किशोर काकडे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून सुभाषचंद बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. किशोर काकडे यांनी प्रास्ताविक केले. संगीता एडके यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
याप्रसंगी शोभा लोकूर यांनी विजेत्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले. गोविंद फडके यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बुक लव्हर्स क्लब, विवेकानंद केंद्र, बालकुमार साहित्यचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नागेश डोणकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांनी भाषण केले. लक्ष्मण पवार यांनी आभार मानले. रामचंद्र एडके यांनी शांतीमंत्र सादर केले.









