फार्महाऊसमधून 38 किलो 700 ग्रॅम एमडी हस्तगत : ड्रग्ज प्रकरणातील हायप्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट ढोलगरवाडीशी
प्रतिनिधी /चंदगड
चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पूर्ण केला आहे. त्यानुसार ड्रग्ज प्रकरणातील हायप्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट ढोलगरवाडीशी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या कारवाईत एकूण 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्ज, 39 लिटर केमिकल आणि एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
अमलीपदार्थ प्रकरणी फार्महाऊसचा केअरटेकर निखिल लोहार आणि ड्रग्ज पेडलर ख्रिस्तीना मॅनलिन ऊर्फ आयेशा या दोघांना अटक केली असून मुख्य आरोपी राजकुमार राजहंस याचा शोध सुरू असल्याची माहिती मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी दत्ता नलवडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यामधील मुख्य आरोपी हा ढोलगरवाडी गावचा असून कामानिमित्त मुंबईत होता. एमडी ड्रग्ज बनविणे व मुंबईत वितरित करत असल्याचे मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे.
ढोलगरवाडी येथील फार्महाऊस प्रकरणाचा गेल्या चार-पाच दिवसांपासून तपास सुरू होता. दरम्यान याप्रकरणात अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या वांदे युनिटने एका महिलेला अटक केली आहे. 50 ग्रॅम एमडी ड्रग्जसह तिला अटक केली होती. मुंबईत अटक करण्यात आलेली महिला एक पेडलर आहे. हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड तालुक्मयातील ढोलगरवाडी गावातून आल्याचे स्पष्ट झाले.
तीन पथके ढोलगरवाडीत
मिळालेल्या माहितीनुसार वांदे युनिट आणि घाटकोपर युनिटची तीन पथके चंदगड तालुक्मयातील ढोलगरवाडी येथे पाठविण्यात आली होती. येथील फार्महाऊसवर सर्च ऑपरेशन करून तीन दिवसांच्या तपासानंतर 38 किलो 700 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. तसेच एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रॉ-मटेरियलसुद्धा जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले एकूण साहित्य 2 कोटी 35 लाख रुपयांचे आहे. याप्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मुख्य आरोपी राजकुमार राजहंस सध्या फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणात फार्महाऊसच्या केअरटेकरला अटक करण्यात आली असून तो या संपूर्ण प्रकरणात सहभागी होता. यातील मुख्य आरोपी हा मूळचा ढोलगरवाडीचा असून तो कामानिमित्त मुंबईत राहत होता. अद्याप मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे पत्रकार परिषदेत डीसीपी दत्तात्रय नलवडे यांनी सांगितले.
तीन वर्षांपासून सुरू होता पुरवठा…
मुख्य आरोपी हा मुंबईवरून ढोलगरवाडीला रॉ-मटेरियल घेऊन यायचा आणि एमडी ड्रग्ज घेऊन मुंबईला जायचा. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात स्थानिक पातळीवर कोणतीही वितरण साखळी आढळून आलेली नाही. याप्रकरणात मुख्य आरोपी आणि त्या फार्महाऊसचा केअरटेकर या दोघांचाच संपूर्ण सहभाग आढळून आला आहे.