प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम व मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्यात महत्त्वाची बैठक झाली असून मगोचा पाठिंबा हवा असल्यास मगो पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मगो पक्ष भाजप किंवा डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा देणार नसल्याचा पुनरुच्चार ढवळीकर यांनी केला आहे.
मगो पक्षाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम आणि ढवळीकर यांच्या बैठकीमुळे काँग्रेस व मगो पक्ष सरकार स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा मतमोजणीनंतर निकाल लागेल तेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे चित्र समोर येणार आहे. 10 मार्च रोजी निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण होणार आहे. काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मगो पक्षाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांना सरकार बनविता येणार नाही. मगोपच्या पाठिंब्याशिवाय सरकारची स्थापना होणे कठीण आहे. जो पक्ष मगो पक्षाला मदत करेल त्या पक्षाला मगो पाठिंबा देणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
मला मंत्रिमंडळातून डॉ. सावंत व भाजपने बाहेर काढले आणि इतर आमदार खरेदी केले म्हणून आपण त्यांना पाठिंबा देणार नसल्याचा खुलासा ढवळीकर यांनी केला आहे. त्यामुळे ढवळीकर व मगो पक्षाचा एकंदरीत कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे समोर येत आहे. ही वस्तुस्थिती पाहता काँग्रेस-मगो अपक्ष एकत्र येऊ शकतात, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणणार!
चिदंबरम यांनी सांगितले की, मगो पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. कारण मगो पक्ष भाजपसोबत जाणार नाही. भाजपने मगोच्या पाठित खंजिर खूपसून ढवळीकरांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने मगो-भाजपचे काहा rजमणार नाही. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत बहुमत मिळविणार असून ते मिळाले तरी देखील काँग्रेस भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून सरकार करेल, अशी खात्री चिदंबंरम व्यक्त केली आहे. मगो-आप-तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांशी निकालानंतर युती करण्यास काँग्रेसची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









