जखिणवाडी येथील घटना, संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात
वार्ताहर/ कराड
आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांचा खून केल्याची घटना जखिणवाडी (ता. कराड) येथे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी नारू पाटील (वय 62, रा. मळाईदेवी मंदिराजवळ, जखिणवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर संशयित अर्जुन शिवाजी पाटील (वय 37) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची खबर युवराज बाळू निकम याने शहर पोलिसांत दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पाटील हे जखिणवाडी येथे मळाईदेवी मंदिराजवळ पत्नी रंगुबाई, मुलगा अर्जुन तसेच मुलीची दोन मुले युवराज व विराज यांच्या समवेत राहात होते. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास युवराज जेवण करून झोपण्यासाठी मळाईदेवी मंदिराकडे गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या घरासमोर महिलांचा आरडाओरडा सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो घराकडे परत आला. तेव्हा युवराजचा मामा अर्जुन हातामध्ये पहार घेऊन उभा होता. तर आजोबा शिवाजी पाटील हे जमिनीवर पडले होते. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते. यावेळी युवराजने अर्जुनच्या हातातील पहार हिसकावून घेऊन कोपऱयात टाकली. त्यानंतर अर्जुन घरातून निघून गेला.
घडल्या प्रकाराबाबत युवराजने आजी रंगुबाई यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, अर्जुन जेवण करीत असताना वडील शिवाजी पाटील हे अर्जुनला शिव्या देत होते. त्यावेळी रंगुबाई यांनी शिवाजी पाटील यांना गप्प बसा, असे म्हटले. या कारणावरून शिवाजी पाटील यांनी रंगुबाई यांनाही शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून अर्जुन याने शिवाजी पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पहारेने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले होते.
दरम्यान, युवराज यांने जखमी शिवाजी पाटील यांना इतर ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित अर्जुन पाटील याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत.









