मुंबई/प्रतिनिधी
काही दिवसांपुर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या अमानवीय अत्याचाराचे पडसाद देशभर उमटले होते. यानंतर दुसऱ्या – तीसऱ्या दिवशीच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात लैंगिक अत्याचारग्रस्त गर्भवती पीडितेने आत्महत्त्या केल्याचे समोर आले होते. यावर समाजमन चांगलच ढवळून निघाले होते. अशीच मानवीयतेला काळीमा फासणारी घडना आज मुंबईतील डोंबिवलीत घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असून हा प्रकार डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या आठ महिन्यापासुन सुरु असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. या अत्याचार प्रकरणात ३० नराधम सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पैकी २८ संशयिताना पोलीसांनी अटक करत आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर फरार संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होण्यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी देखील सहा जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. पण आरोपींचा त्रास सहन होत नसल्याने शेवटी पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. बलात्कार करत असताना आरोपींनी अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केल्याचं देखील पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.