भारतीय संस्कृतीचे आकर्षण
संतोष सावंत / सावंतवाडी:
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. बलाढय़ समजल्या जाणाऱया अमेरिकेत कोरोनाची भीती प्रत्येकाला आहे. सुरुवातीला अमेरिकेतील जनतेने गांभीर्याने घेतले नसल्यानेच मोठय़ा प्रमाणात फैलाव झाला आहे. भारतातील पारंपरिक संस्कृती, राहणीमान तसेच आयुर्वेद यांचा आधार घेतला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला ‘लॉकडाऊन’ व अन्य निर्णयाचे अमेरिकेत स्वागत होतेय. त्यामुळे भारतीयांनी सरकारचे नियम पाळणे हाच रामबाण उपाय आहे, असे मूळ कलंबिस्त येथील व सध्या अमेरिकेत आय. टी. विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नंदकिशोर राजेश सावंत यांनी सांगितले.
अमेरिकेत या हंगामात तुफान बर्फ पडतो. मात्र, यंदा ‘कोरोना’चे महासंकट ओढवले असताना गेले दीड-दोन महिने बर्फच गायब झाला आहे. मी सहा वर्षे अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात तुफान बर्फ पडतो. मात्र, यंदा प्रथमच बर्फ पडण्याचे प्रमाण घटले आहे. हे अमेरिकेचे सुदैव म्हणावे लागेल, असे तो सांगतो.
15 मार्चपासून अमेरिका स्तब्ध
अमेरिकेने 15 मार्चनंतरच गांभीर्याने घेतले. पूर्वी सर्व आलबेल चालले होते. जेव्हा बोस्टन शहरात एका कंपनीने कॉन्फरन्स घेतली, त्यात दोन युरोपचे लोक सहभागी झाले होते. त्याच कॉन्फरन्समध्ये 100 जणांना पहिली लागण झाली. त्यानंतर ‘कोरोना’चा फैलाव एवढा झाला की, आता प्रत्येक नागरिक कोरोनाच्या धास्तीने गारठला आहे. मी अमेरिकेच्या मुख्य शहरात राहतो. 15 मार्चपासून लॉकडाऊन असल्याने प्रत्येकाने होम क्वारंटाईन करून घेतले आहे. अमेरिकेच्या मुख्य शहरात मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अमेरिकेच्या या मुख्य शहरात 70 ते 80 हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. न्यूयार्क अवघ्या पाच तासावर आहे. न्यूयार्क शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत भारतीय वंशाच्या सुमारे 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्थव्यवस्थेपेक्षा जीवन हेच श्रेष्ठ, असे येथील लोकांना वाटत आहे. ‘डॉलर्स नको, जीवन हवे’ यासाठी ते महिनाभर घरीच बसून आहेत.
शिक्षण ऑनलाईन
प्रशासनाने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सर्व शिक्षण ऑनलाईन केले. गेले दोन महिने ऑनलाईन शाळा, महाविद्यालयाचा अभ्यास सुरू आहे. मी इंडस्ट्रीज बिझनेसमध्ये पी. एच. डी. करतोय. माझा अभ्यासक्रम तसेच परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहे.
घरोघरी भारतीय आयुर्वेदाचा वापर
‘कोरोना’ला हरविण्यासाठी भारतीय संस्कृतीचे पालन, सोशल डिस्टन्सिंग, आयुर्वेद औषधे, उकळलेले पाणी, हळद-आले याचे पाणी याचा वापर मोठय़ा
प्रमाणात केला जातोय.
भारताने वेळीच उपाययोजना हाती घेतल्या. लॉकडाऊन, जनता कर्फ्यू यासारखे इव्हेंट केले. याच इव्हेंटचे अमेरिकेत कौतुक होतेय. जर भारतात लॉकडाऊनची मुदत वाढवली नसती तर अमेरिका जे आता भोगतेय, तशी काहीशी स्थिती भारतात उद्भवली असती. अमेरिकेत गेले दीड महिना कंपनी, अन्य महत्वाची कामे घरातून ऑनलाईन सुरू आहेत.









