मुख्यमंत्र्यांकडून खातेबदल : उपमुख्यमंत्री कारजोळ यांच्याकडील समाजकल्याण खाते श्रीरामुलूंना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी खातेबदल केले आहेत. उपमुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बी. श्रीरामुलू यांना धक्का बसला असून त्यांच्याजवळील आरोग्य-कुटुंबकल्याण आणि मागासवर्ग कल्याण खाते काढून घेण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे असणारे समाजकल्याण खाते श्रीरामुलूंना देण्यात आले आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याकडे आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आरोग्य खाते काढून घेण्यात आल्याने श्रीरामुलू नाराज झाले आहेत. ते भाजप हायकमांडची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यापासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. मात्र, तीनवेळा तो लांबणीवर पडला. दरम्यान, श्रीरामुलूंजवळील आरोग्य खाते आणि मागासवर्ग कल्याण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यापैकी मागासवर्ग कल्याण खाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतले आहे. तर आरोग्य-कुटुंब कल्याण खाते डॉ. सुधाकर यांना देण्यात आले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्याजवळील समाजकल्याण खाते श्रीरामुलूंना देण्यात आले आहे. त्यामुळे गोविंद कारजोळ यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम हे एकच खाते शिल्लक राहिले आहे. या खातेबदलाला राज्यपाल वजुभाई वाला यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखविला आहे.
कोरोनावर नियंत्रण आणण्यात आरोग्य खाते अपयशी ठरल्याचा ठपका विरोधी पक्षातील नेत्यांनी ठेवला होता. मंत्री बी. श्रीरामुलू आणि डॉ. के सुधाकर यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यावर विश्वास दाखवत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचीही जबाबदारी सोपविली आहे.
येडियुराप्पांकडून श्रीरामुलूंना भेटीसाठी आमंत्रण?
आपल्याजवळील दोन्ही खाती काढून घेऊन केवळ समाजकल्याण खाते दिल्याने मंत्री बी. श्रीरामुलू नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे मुख्यमंत्री येडियुराप्पांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी दिल्लीतील वरिष्ठांनाही फोन करून याबाबत माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे नाराज असलेल्या श्रीरामुलू यांची समजूत काढण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 10 वाजता भेटीसाठी बोलावल्याचे सुत्रांकडून समजते.