प्रतिनिधी / फोंडा :
कुर्टी पंचायत क्षेत्रातील दीपनगर भागात पथदीपांची सोय नसल्याने मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी स्वखर्चाने वीज साहित्य पुरवून हा परिसर प्रकाशनमान केला आहे. ऐन चतुर्थीच्या काळात दीपनगरात पथदीप पेटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दीपनगर भागात पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी ये-जा करणारे वाहनचालक व पादचाऱयांची गैरसोय व्हायची. स्थानिकांनी ही समस्या डॉ. भाटीकर यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन दिवसात विजेचे दिवे, वायर तसेच इतर साहित्य पुरवून वीज खात्याच्या साहाय्याने या भागात पथदीप घातले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर हा भाग प्रकाशमान झाला आहे. याकामी दीपनगर भागातील कार्यकर्ते चेतन सुतार व निखिल सांगावकर यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती डॉ. भाटीकर यांनी दिली.
जंतुनाशक फवारणी उपक्रम
दरम्यान फोंडा पालिका क्षेत्र व कुर्टी पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागात कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मगोचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी जंतुनाशक फवारणीचा उपक्रम राबविला. आत्तापर्यंत साधारण दिड हजार घरांमध्ये जंतूनाशक फवारणी केल्याची माहिती डॉ. भाटीकर यांनी दिली.
फोंडा भागात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने व विविध भागात रुग्ण आढळू लागल्याने डॉ. भाटीकर यांनी स्थानिक पंचसदस्य, नगरसेवक व आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या त्या भागात जंतूनाशक फवारणीचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार आत्तापर्यंत कुर्टी पंचायत क्षेत्र व फोंडा पालिका क्षेत्रातील विविध प्रभागामध्ये ही फवारणी करण्यात आली.









