बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्ट सिटी अंतर्गत डॉ. एस. पी. एम. रोड तसेच महात्मा फुले रोडचे काम सुरू आहे. मात्र याचा फटका वाहनचालकांना तसेच नागरिकांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. एसपीएम. रोडवर (छ. शिवाजी उद्यानासमोर) एका बाजुच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे दुसऱया बाजुच्या रस्त्यावरून वाहतुक सुरू आहे. मात्र या रस्त्यावर डेनेज वाहिनी घालण्यासाठी जेसीबीद्वारे मोठा खड्डा खोदण्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आहे. यामुळे सोमवारी छ. शिवाजी उद्यानासमोरील एसपीएम रोडवर वारंवार वाहतुक कोंडी झाली होती. याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना सोसावा लागला.
एका बाजुच्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असताना दुसऱया बाजुच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खोदाई करण्यात आल्याने सोमवारी सकाळपासुनच या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरून अवजड वाहनांचीही वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वाहतूक कोंडीत भर झाली होती. यामुळे वाहनचालकांसह नागरिक आणि या भागातील व्यापारी वर्गातून तिव्र नाराजी व्यक्त होत होती. रस्त्याच्या एका बाजुचे काम पूर्ण झाल्यानंतरच खोदाईचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्ता काम अर्धवट अवस्थेत असताना दुसऱया बाजुच्या रस्त्यावरही खोदाई करून रस्ता बंद करण्यात आल्याने वाहन चालकांचे हाल झाले. दरम्यान सायंकाळच्या सुमारास बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथे बॅरिकेड्स लावून या मार्गावरून अवजड वाहनांना निर्बंध घालण्यात आले. यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.









