मित्रानेच हाणला डोक्मयावर दगड. जागीच गतप्राण. खून केल्याचे पोलिसांसमोर केले मान्य. दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादातून पुन्हा वाद उफाळला.

डिचोली/प्रतिनिधी
बंदरवाडा डिचोली येथे रवि. दि. 20 मार्च रोजी रात्री दोन मित्रांमध्ये मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून घडलेल्या झटापटीत एका मित्राने दुसऱया मित्राच्या डोक्मयावर दगड हाणण्याची घटना घडली. या घटनेत गावकरवाडा डिचोली येथील अरूण अशोक परब (वय 40) हा जागीच गतप्राण झाला. तर या झटापटीत संशयित रामेश्वर प्रशांत वाडकर (वय 21) हाही जखमी झाला होता. त्याला इस्पितळातून सोडण्यात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदर प्रकार आपल्या हातून घडल्याचे मान्य केले.
सदर घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास बंदरवाडा डिचोली येथील दुग्ध उत्पादन सोसायटीजवळ घडली. मयत अरूण परब व संशयित रामेश्वर वाडकर यांच्यात गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. व त्या वादाच्या दरम्यान अरूण याने रामेश्वर याला आई वडिलांना संबोधून शिवीगाळ केली होती. सदर वाद झाल्यानंतर रवि. दि. 20 रोजी दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांच्या मद्यप्राशनाचा बेत झाला. डिचोली बाजारातील एका मद्यालयातून दारू पार्सल घेतली. ती प्राशन केल्यानंतर चालतच त्यांनी बाजारातील एका गाडय़ावर ऑम्लेट पावही बरोबर खाल्ला, तेथून बसस्थानकाजवळून बंदरवाडा मार्गे गावकरवाडा येथे जात असतानाच बंदरवाडा येथे दुग्ध उत्पादन सोसायटीजवळ त्यांच्यात वाद झाला.
या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. दोघांमध्ये बरीच झटापट झाली. एकमेकांना जमिनीवर पाडल्यानंतर रामेश्वर याच्या हाती दगड लागला आणि त्याने तो थेट अरूणच्या डोक्मयावर हाणला. दगड हाणताच रामेश्वरही खाली कोसळला आणि त्यालाही जखम झाली. तो खाली पडून तडफडत असताना तेथे आलेल्या लोकांनी पोलीस व 108 रूग्णवाहिकेला संपर्क साधला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोघांनाही रूग्णवाहिकेत घालून डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे अरूण याला मृत घोषित करण्यात आले. तर रामेश्वर याच्यावर उपचारासाठी त्याला दाखल करून घेण्यात आले. सकाळी त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर डिचोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर प्रकार आपल्या हातून घडल्याचे कबूल केले. तत्पूर्वी डिचोली पोलिसांनी बाजार परिसरातील सर्व सिसीटिव्ही केमेरांची फुटेज तपासली. व त्यातून काही माहिती गोळा केली. तसेच त्यांनी रात्री एकत्रितपणे ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या त्याही ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली.
घटनास्थळी फोरेन्सिक लेबचे पथक, श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले. डिचोली पोलीस उपअधिक्षक सागर एकोसकर यांनी तसेच पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक गोष्टी जप्त केल्या. सध्या रामेश्वर वाडकर याच्या विरोधात भा.द.स. च्या 302 या खुनाच्या कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधिक्षक शोबीत सक्सेना, डिचोली उपअधिक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक महेश गडेकर अधिक तपास करीत आहे.









