नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी जागतिक स्तरावर सहकार्य करण्यावर चर्चा झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांचे कौतुक केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. तसेच या चर्चेत कोरोनावरील आधुनिक पद्धतीच्या उपाय योजनेसोबतच पारंपरिक पद्धतीच्या औषधांचा वापर करण्यावरही एकमत झाले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेत जागतिक स्तरावर कोरोनाविरोधात करण्यात येणाऱया उपाययोजना आणि त्यासाठी लागणारे भारताचे सहकार्य यावर चर्चा झाली.’ असे सांगण्यात आले आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी कोरोनाविरोधात लढताना अन्य रोगांच्या विरोधातील लढाईकडे दुर्लक्ष होऊ नये असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून विकसनशील देशांना मिळणाऱया मदतीवर समाधान व्यक्त केले.