भोगावती / प्रतिनिधी
परिते ता करवीर येथील ठिकपुर्ली फाट्यावर मंगळवारी मोटारसायकल व डंपरच्या अपघातात सौ अंजना बळीराम किरूळकर (वय ५६ वर्षे रा राशिवडे खुर्द ता राधानगरी) ही महिला जागीच ठार झाली. भरधाव डंपरच्या चाकाखाली महिला सापडल्याने रस्त्यावर मेंदू इतस्ततः विखुरला होता. त्यामुळे अपघातस्थळाचे चित्र विदारक दिसत होते.
याबाबतणी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राशिवडे खुर्द गावातील संदीप किरूळकर हा मुलगा आपल्या आईला भोगावती येथील दवाखान्यात दाखवून परत जात होता.आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम.एच.०९ एफ एस ३००६) ते राशिवडे बुद्रुककडे चालले होते.मात्र ठिकपूर्ली फाट्याजवळ कोल्हापूरकडे जाणाऱ्या डंपरला (क्रमांक एम.एच.११ ए.एल २३९५) बाजू देऊन पुढे जात असतानाच अचानक अंजना या गाडीवरुन खाली पडल्या.
त्यांच्या डोक्यावरून डंपरची पाठीमागील दोन्ही चाके गेल्यामुळे डोके फुटले. त्यामुळे मेंदू रस्त्यावर इतस्ततः पसरला होता तसेच मुलगा संदीप यांच्या अंगावरील कपड्यावर रक्त व मेंदू उडालेला होता. त्यामुळे अपघातस्थळी काळीज पिळवटणारे दृश्य होते.अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील लोकांची घटनास्थळी मोठी गर्दी होती. हे दुर्दैवी दृश्य पाहून प्रत्येक जण हळहळत होते.अपघातामुळे काहीकाळ वहातुक ठप्प झाली होती.