क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत काल झालेल्या लढतीत मोहम्मेडन्स स्पोर्टिंग व केरळ ब्लास्टर्स संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविले. नैहाटीत झालेल्या लढतीत कोलकाताच्या मोहम्मेडन्स स्पोर्टिंग क्लबने आपल्या सलग तिसऱया विजयाची नोंद करताना इंडियन एअर फोर्स संघाचा 2-0 गोलानी पराभव केला. मोहम्मेडन्ससाठी डियाये आणि पास्वान यांनी गोल केले.
या विजयाने मोहम्मेडन्स स्पोर्टिंगचे आता 3 सामन्यांतून 9 गुण झाले. इंडियन एअर फोर्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. गुवाहाटीत इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात केरळ ब्लास्टर्सने नॉर्थईस्ट युनायटेडचा 3-0 असा पराभव केला. केरळ ब्लास्टर्ससाठी आयमेनने दोन तर अजसालने एक गोल केला. विजयाच्या 3 गुणांनी केरळ ब्लास्टर्सचे आता तीन सामन्यांतून 4 गुण झाले असून इंडियन एअर फोर्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.
आज रविवारी इंफाळात ट्राव एफसी व आर्मी रेड तर कोलकातात विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ईस्ट बंगाल आणि एटीके मोहन बागान यांच्यात लढत होणार आहे.









