– राज्य सरकारची मोठी घोषणा, – अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची माहिती – 1 मे पासून होणार लसीकरण
प्रतिनिधी / मुंबई
राज्यातील वाढते कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलत राज्यातील 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या 1 मे पासून संपूर्ण राज्यभरात हा मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी मंत्री मलिक म्हणाले, राज्य सरकार आपल्या खर्चाने हा कार्यक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा मागविण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. मागच्या वेळेस झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या दराबाबत चर्चा झाली होती. यावर एकमत होऊन राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली होती. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी काल शनिवारी हे जाहीर केले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले होते.
केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी कोविशिल्ड लसीचा दर पेंद्र सरकारला दीडशे रुपये, राज्य सरकारला 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतही 600 रुपये राज्यांना आणि 1200 रुपये खासगी रुग्णालयांना जाहीर झाले असल्याचे मलिक यांनी सांगितले.
देशातील 17 राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने मोफत लसीची घोषणा करत कोरोना संकट काळात जनतेला दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र दिनीच लसीकरणाचा शुभारंभ
1 मे महाराष्ट्र दिनीच राज्यातील जनतेला मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिले आहेत.
रेमडेसिवीरचा साठा वाढवुन दिल्याबद्दल केंद्राचे आभार
पेंद्र सरकारच्यावतीने राज्यांना वाटप करण्यात येणारा रेमडेसिवीरचा डाटा जाहीर करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीने राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता देण्यात येणारा साठा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यावर पेंद्राने शनिवारी 26 हजार दर दिवशी देणार होते त्यात 40 हजार अशी वाढ जाहीर केली आहे. मात्र दरदिवशी 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा अशी मागणी आहे. केंद्राने `रेमडेसिवीर’चा साठा वाढवून दिला त्याबद्दल पेंद्राचे मलिक यांनी आभार मानले.
परदेशातूनही लस खरेदी
कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीन या लसींचे सर्व उत्पादन भारतासाठी वापरले, तरी भारताची लोकसंख्या पाहता लस कमी पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या भारतीय लसींबरोबरच परदेशातील विविध कंपन्यांची लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देईल. त्यामुळे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लशींच्या जेवढÎा कुप्या उपलब्ध होतील, तेवढÎा घेतल्या जाणार आहेत. मात्र, परदेशी लस खरेदीचा अधिकार दिल्यानंतर त्या तातडीने उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
या खरेदीकरिता प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नियुक्त करण्यात आली असून, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि उद्योग या तीन विभागांचे सचिव समितीचे सदस्य आहेत. रेमडेसिविर, लस खरेदीसह कोरोनाविषयक आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार मुख्य सचिव कुंटे यांना मंत्रिमंडळाने दिले आहेत.