वृत्तसंस्था/ हैदराबाद
पुढील वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी दुती चंद ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. मात्र पैशांची चणचण भासत असल्याने भारताच्या या सर्वात वेगवान महिला धावपटूने सेडान ही आलिशान कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.
भुवनेश्वरस्थित 24 वर्षीय दुती चंद या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. तिने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रांचीत झालेल्या 59 व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत 11.22 सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. पण मार्चमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू झाल्यानंतर अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने तिची घोडदौडही रोखली गेली. गेल्या एप्रिलमध्ये फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धा पतियाळामध्ये होणार होती. पण ती रद्द करण्यात आली. तेव्हापासून ती भुवनेश्वरमध्ये घरीच आहे. गेल्या मे मध्ये ओडिशा सरकारने लॉकडाऊन थोडे शिथिल केल्यानंतर तिला सराव करण्याची परवानगी देण्यात आली आणि तेव्हापासून ती कलिंगा स्टेडियमवर सराव करीत आहे. हैदराबादमधील प्रशिक्षक एन. रमेश हे तिला ऑनलाईन मार्गदर्शन करीत असून तिच्या प्रगतीवर ते बारीक लक्ष ठेवून आहेत.
भुवनेश्वरहून बोलताना दुती चंद म्हणाली की, ‘ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मी काही रक्कम वेगळी काढून ठेवली होती. पण लॉकडाऊनमध्ये मला ती सर्व खर्च करावी लागली. पण आता ऑलिम्पिक एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आले असल्याने मी पुन्हा ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. मात्र ट्रेनिंगच्या खर्चासाठी मला सुमारे 25 लाख रुपयांची गरज लागणार असल्याने मी सेडान कार विकण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे तिने स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात वैयक्तिक खर्चाबरोबरच तिने अनेक गरजूंना मदतही केली असल्याने तिच्याजवळचा निधी संपुष्टात आला आहे. मात्र पुरस्कर्ते पुढे येत नसल्याबद्दल तिने यावेळी खंतही व्यक्त केली. ‘कोरोना महामारीमुळे टेनिंगचा खर्च देण्यासाठी पुरस्कर्ते मदतीचा हात देण्याचे टाळत आहेत. मला डाएटसाठी पैशांची नितांत गरज असून ऑलिम्पिक स्वप्न साकारण्यासाठी ट्रेनिंगकरिता विदेशात जाण्याची योजनाही आखली आहे,’ असेही ती म्हणाली.
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या दुतीने टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीचे वेळापत्रक अजून आखलेले नाही. ट्रेनिंगसाठी जर्मनीत जाण्याचा तिचा विचार आहे. ‘जगभरात आता टप्प्याटप्प्याने खेळाला सुरुवात करण्यात येत असून फुटबॉल, क्रिकेटसारख्या प्रमुख खेळांना युरोपमध्ये सुरुवातही झाली आहे. सप्टेंबरपासून भारतातही स्पर्धांना सुरुवात होईल, अशी मला आशा वाटत असून भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने (एएफआय) आपली योजना जाहीर केल्यानंतर मी ऑलिम्पिकच्या तयारीचे वेळापत्रक निश्चित करणार आहे,’ असेही तिने सांगितले.









