चिकोडी-संकेश्वर मार्गावरील घटना
प्रतिनिधी/ संकेश्वर
भरधाव ट्रक्टरने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास चिकोडी-संकेश्वर मार्गावरील बोरगल फाटा येथे झाला. सुनील बसवराज पाटील (वय 23, रा. सोलापूर, ता. हुक्केरी) असे मृताचे नाव आहे. तर आनंद दुंडाप्पा पाटील (रा. कमतनूर, ता. हुक्केरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद व सुनील हे दोघे मित्र चिकोडीला काही कामानिमित्त पल्सर दुचाकीवरून गेले होते. सायंकाळी 4 च्या सुमारास काम आटोपून ते परतत असताना चिकोडी-संकेश्वर मार्गावर बोरगल येथील स्टोनक्रशरकडे भरधाव वेगात जाणाऱया ट्रक्टरची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यात ते दोघेही फेकले गेले. यामध्ये सुनील याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे.









