सुशांत कुरंगी / बेळगाव
ट्रकची बॉडी बनवून घ्यायची असेल तर ती बेळगावमध्येच, असे ट्रकपेमी आवर्जून सांगतात. बेळगावमध्ये तयार करण्यात येणाऱया ट्रकच्या बॉडीची तोडच नाही. परंतु सध्या मात्र बेळगावची ही ओळख पुसून जाते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रकच्या रांगा लागलेल्या शेडमध्ये आज मात्र निरव शांतता दिसत आहे. महाराष्ट्रातून येणारे ट्रक थांबल्याने येथील कामगारांच्या हातचे काम गेले. त्यामुळे मागील 70 वर्षांत कमविलेले या कोरोनाने 6 महिन्यात घालविले, अशी अवस्था या व्यवसायाची झाली आहे.
महाराष्ट्रात उद्योगधंदे व शेती उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येत असल्याने वाहतुकीच्या साधनांची संख्या अधिक आहे. यामुळे ट्रकची आवश्यकता सर्वाधिक भासते. त्या ट्रकला तितक्मयाच तोलामोलाच्या बॉडीची गरज लागते. त्यामुळे चांगल्या दर्जाची ट्रकची बॉडी बनवून घ्यायची तर ती बेळगावमध्ये, असे महाराष्ट्रात चित्र निर्माण झाले. बेळगावच्या जुन्या धारवाड रोडवर शिवाजी कंपाऊंडमध्ये या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून पुणे, मुंबई, बारामती, सातारा, कोल्हापूर, सातारा, धुळे येथून बेळगावला ट्रकची बॉडी तयार करण्यासाठी ग्राहक येतात. परंतु कोरोना व त्यानंतर लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प झाली आणि महाराष्ट्रातून बेळगावला येणारे ट्रकही थांबले.
बेळगावमध्ये ट्रकची बॉडीबिल्डींग करणारे लहान-मोठे 100 च्या आसपास कारखाने आहेत. हरिकाका कंपाऊंड, जुना धारवाड रोड, काकती, ऑटोनगर येथे हा व्यवसाय पसरलेला आहे. व्यवसाय मागील 6 महिन्यांपासून बंद असला तरी विजेचे बिल, शेडचे भाडे, वॉचमनचा पगार यासाठी पैसे काढून ठेवावे लागत आहेत. कर्ज काढून शेड सुरू ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.
शेती-गवंडी कामाला जाण्याची वेळ
ट्रक येणे बंद झाल्याने हातचे काम गेले. यामुळे या कामगारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. काही जणांनी लॉकडाऊननंतर शेती करण्यात सुरुवात केली तर काहींनी गवंडी-सेन्ट्रींग कामाला जाण्यास सुरुवात केली. हातात कौशल्य असतानाही त्यांना आता इतर व्यवसाय करावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ट्रक बॉडी बिल्डिंग म्हणजे काय?
ट्रकची केवळ इंजिनसह चेस्सी कंपनीतून देण्यात येते. त्यानंतरचे सर्व काम हे ट्रक बॉडी बिल्डर करतो. केबिन पूर्णपणे लाकडाची करण्यात येते. मागील बाजूस स्टीलचा वापर करण्यात येतो. त्यानंतर समोर ग्लास फिटींग, केबीनमध्ये कुशन, वायरिंग अशी कामे करण्यात येतात. शेवटी ट्रकला कलर करण्यात येतो. त्यानंतर ट्रक रस्त्यावर धावण्यास तयार होतो.
सिद्राई पाटील (ट्रक बॉडी बिल्डर)
आमचा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. इतक्मया वर्षात प्रथमच असा 6 महिने व्यवसाय बंद आहे. कायम ट्रकनी भरलेली गॅरेज सध्या मात्र रिकामी आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने शेडचे भाडे, लाईट बिल, वॉचमनचा पगार द्यावाच लागत आहे. महाराष्ट्रात अजूनही काही शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्याचे व्यवसाय पूर्वपदावर अजून किती कालावधी लागेल याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.









