नवी दिल्ली
गेल्या आठवडय़ात हिंडनबर्ग यांच्या अहवालानंतर शेअरबाजारात अदानी समूहाच्या विविध कंपन्यांचे समभाग घसरले होते. एक आठवडय़ात यामुळे अदानींच्या संपत्तीत 35.5 अब्ज डॉलर्सची घट होऊन 84.4 अब्ज डॉलर्सवर घसरली आहे.
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे आता जगातील टॉप दहा श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले असल्याचे समजते. ब्लूमबर्ग बिलेनियर्स निर्देशांकानुसार एक दिवसात अदानींना 8 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. 29 जानेवारीला त्यांची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्स इतकी होती जी सोमवारी घटून 84.4 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. यामुळे अदानी हे निर्देशांकात 11 व्या स्थानावर घसरले आहेत.
एक आठवडय़ात अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 35 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. 20 नोव्हेंबर 2022 ला त्यांची संपत्ती 150 अब्ज डॉलर्सची होती. याचदरम्यान फसवणुकीसंबंधी हिंडनबर्ग यांना अदानी समूहाने 413 पानांचे उत्तर दिले असल्याचे सांगितले जाते. सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.









