सिडनी / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर न आल्यास आमची बरीच निराशा होईल, असे मत आघाडीचा अव्वल फलंदाज मार्नस लाबुशानेने व्यक्त केले. येथे तो ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होता. यापूर्वीच्या रुपरेषेनुसार, भारतीय संघ या वर्षाच्या उत्तरार्धात कसोटी व मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये तिरंगी टी-20 मालिकेच्या माध्यमातून भारताच्या या दीड महिन्यांच्या दौऱयाला सुरुवात होईल. डिसेंबरमध्ये 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह दौऱयाची सांगता होणे अपेक्षित आहे. सध्या ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय प्रवासावर सप्टेंबरपर्यंत बंदी असून एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीमुळे भारताचा दौरा साशंकतेच्या भोवऱयात आहे.
‘भारतीय संघ दौऱयावर येणार नसेल आणि क्रिकेट होणारच नसेल तर माझ्यासाठी, संघासाठी आणि चाहत्यांसाठी देखील ते निराशानजक असेल’, असे लाबुशाने येथे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. ऑस्टेलियात कोरोनावर उत्तम नियंत्रण ठेवले गेले असून यामुळे भारताचा दौरा होण्यास काहीच अडचण नसेल, असा लाबुशानेचा दावा आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या कोरोनाग्रस्तांचे प्रमाण कमी झाले असून यामुळे राष्ट्रीय लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले गेले आहे. तेथे आतापर्यंत 6800 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून 100 जणांचा यात मृत्यू झाला आहे.









