वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द तरी करण्यात आल्या आहेत किंवा लांबणीवर तरी टाकण्यात आल्या आहेत. या व्हायरसचा प्रसार रोखण्याचा एक उपाय म्हणून अनेक देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या असून हवाई वाहतूकही बंद केली आहे. ऑस्ट्रेलियाने देखील 30 सप्टेंबरपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले असल्याने तेथे होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबतही आता साशंकता निर्माण झाली असल्याने ही स्पर्धा देखील लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबतचा निर्णय ऑगस्टच्या आधी होणार नसल्याचे एका माहितगार सूत्राने सांगितले.
टी-20 विश्वचषक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेच्या भवितव्याबाबत ऑगस्टअखेरच्या आधी आयसीसी कोणताही निर्णय घेणार नाही, असे या सूत्राने सांगितले. आयसीसीने जर मेमध्येच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि कोरोना महासाथीच्या स्थितीत काही महिन्यानंतर सुधारणा झाली तर आयसीसीने घेतलेला निर्णय घाईचा ठरेल आणि त्यांची पंचाईत होऊ शकतो. अशी वेळ येऊ नये यासाठी ऑगस्टअखेरपर्यंत या संदर्भात आयसीसी कोणताही निर्णय जाहीर करण्याची अपेक्षा नसल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे. ‘सध्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा होणार असून आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ती घेतली जाईल, असेच सर्वानी गृहित धरून चालले पाहिजे. त्यामुळे आयसीसीची स्थानिक स्पर्धा संयोजन समिती या स्पर्धेची जोमारी तयारी करीत असून ऑक्टोबरपर्यंत ती पूर्ण सज्जता झालेली असेल,’ असेही सूत्राने सांगितले.
आयसीसी सीईसी बैठक गुरुवारी
आगामी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने गुरुवारी 23 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक होत आहे. या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व सचिव जय शहा करणार आहेत.
‘अनेक स्पर्धा, मालिका रद्द झाल्यामुळे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकचे पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे या बैठकीत फ्युचर टूर्स प्रोग्रामबाबतच प्रामुख्याने चर्चा होणार आहे. तसेच विश्व कसोटी चॅम्पियनशिप, क्रिकेट वर्ल्ड कप सुपरलीग याबाबतही विचार केला जाणार आहे. यावर तोडगा निघण्यासाठी एकच बैठक पुरेशी ठरणार नसून यासाठी अनेक बैठका घ्याव्या लागणार आहेत, असे आयसीसीचे प्रमुख कार्यकारी मनू साहनी यांनी सांगितले.