भारत 6 गडय़ांनी विजयी, श्रेयस अय्यर सामनावीर-मालिकावीरचा मानकरी
स्पिनर्स यांचा भेदक मारा आणि सामनावीर व मालिकावीर श्रेयस अय्यरची फटकेबाजी यांच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात लंकेवर 6 गडय़ांनी मात करीत मालिका 3-0 अशी एकतर्फी फरकाने जिंकली.
भारताने लंकेला 5 बाद 146 धावांवर रोखले. सिराजने 22 धावात 2 तर सिराजने 23 धावांत 2 बळी मिळविले. लंकेतर्फे कर्णधार दसुन शनाकाने शानदार अर्धशतक नोंदवताना नाबाद 74 धावांचे योगदान दिले. त्यानंतर 16.5 षटकांत 4 बाद 148 धावा जमवित भारताने 6 गडय़ांनी सहज विजय मिळविला. रोहित शर्मा (5) व सॅमसन (18) लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस व हुडा (21) यांनी 38 धावा भर घातल्यानंतर श्रेयसने जडेजासमवेत 45 धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताचा विजय साकार केला.
श्रेयसने 45 चेंडूत 9 चौकार व एक षटकांच्या मदतीने नाबाद 73 धावा फटकावल्या. जडेजा 15 चेंडूत 22 धावा जमवित नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. लंकेच्या लाहिरु कुमाराने 39 धावांत 2, करुणारत्ने व चमीरा यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

रोहित शर्माचा हा कर्णधारपदाचा 125 वा टी-20 सामना असून तो आता याबाबतीत सर्वाधिक नेतृत्व करणारा कर्णधार बनला आहे. या सामन्यात भारताने उपकर्णधार बुमराह, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर यांना विश्रांती दिली होती. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस मदत करणारी असल्याने भारताच्या युवा गोलंदाजांनी त्याचा लाभ घेत लंकेच्या फलंदाजांवर प्रारंभापासूनच अंकुश ठेवला. याशिवाय मनगटी स्पिनर्स रवी बिश्नोई (1-32) व कुलदीप यादव (0-25) यांनीही उत्तम मारा करीत लंकन फलंदाजांना जास्त मोकळीक मिळू दिली नाही. गेल्या दोन वर्षापासून बिश्नोई अचूकतेने गुगली गोलंदाजी करीत आहे. मात्र आयपीएलमध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची गोलंदाजी खेळताना फलंदाज गोंधळताना दिसत आहेत. लंकेचा कर्णधार दसुन शनाका पुन्हा एकदा संघाचा तारणहार ठरला. त्याने केवळ 38 चेंडूत नाबाद 74 धावा फटकावल्याने संघाला दिडशेच्या जवळपास मजल मारता आली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार व दोन षटकार मारले.
लंकेने प्रथम फलंदाजी स्वीकारली तरी अवेश खान व सिराज यांनी वेग व बाऊन्सचा अचूक उपयोग करीत लंकेच्या आघाडी फळीला खिंडार पाडले आणि चौथ्याच षटकात त्यांची स्थिती 3 बाद 11 अशी केली. यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाहीत. सिराजने प्रथम दनुष्का गुणतिलकाला उसळत्या चेंडूवर शून्यावर बाद केले. पुल करताना त्याने चेंडू आपल्याच यष्टय़ांवर ओढवून घेतला. पहिल्या सामन्यात अवेश खानने 40 हून अधिक धावा देताना एकही बळी मिळविता आला नव्हता. त्याची भरपाई त्याने या सामन्यात करताना पथुम निसांका (1) व चरिथ असालंका (4) यांना तंबूत धाडले. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रत्येक जागेसाठी पर्याय मिळावेत यासाठी विविध खेळाडूंना ते आजमावून पाहत आहेत. फक्त ऑफस्पिनरची या संघात उणीव असली तरी वर्ल्डकपसाठी आर. अश्विनला निवडले जाण्याची शक्यता वाटत नाही.
प्रमुख खेळाडूंची गैरहजेरी असूनही या सामन्यात नवोदित युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. सूर्यकुमार यादव व दीपक चहर जखमी असल्यामुळे संघाबाहेर आहेत. पण दुसऱया सामन्यात इशान किशनही डोक्याला चेंडू लागून जखमी झाल्याने त्यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याला शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण रविवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दक्षता म्हणून त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. सिराज, अवेश खान, हर्षल पटेल यांनी दखल घेण्यायोग्य कामगिरी करून दाखवली आहे. फॉर्म हरवणे, दुखापती या बाबींचा विचार करून पर्याय उपलब्ध ठेवण्याची दक्षता व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.
लंकेच्या डावात शनाकाशिवाय दिनेश चंडिमलने 25, चमिका करुणारत्नेने नाबाद 12 धावा केल्या तर अवांतराच्या रूपात त्यांना 21 धावा मिळाल्या. भारतातर्फे हर्षल पटेल व बिश्नोई यांनीही एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः लंका 20 षटकांत 5 बाद 146 ः निसांका 1, गुणतिलका 0, असालंका 4, जनिथ लियानगे 9, चंडिमल 25 (27 चेंडूत 2 चौकार), शनाका नाबाद 74 (38 चेंडूत 9 चौकार, 2 षटकार), करुणारत्ने नाबाद 12, अवांतर 21. गोलंदाजी ः सिराज 1-22, अवेश खान 2-23, हर्षल पटेल 1-29, कुलदीप यादव 0-25, बिश्नोई 1-32.
भारत 16.5 षटकांत 4 बाद 148 ः संजू सॅमसन 12 चेंडूत 18, रोहित शर्मा 5, श्रेयस अय्यर नाबाद 73 (45 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), दीपक हुडा 21 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वेंकटेश अय्यर 5, रविंद्र जडेजा नाबाद 22 (15 चेंडूत 3 चौकार), अवांतर 4. गोलंदाजी ः लाहिरु कुमारा 2-39, करुणारत्ने 1-31, द चमीरा 1-19, फर्नांडो 0-35, व्हान्डरसे 0-24.









