वृत्तसंस्था /.दुबई :
आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज के.एल. राहुलने आपले सहावे स्थान कायम राखले आहे. या यादीत कर्णधार विराट कोहली नवव्या स्थान स्थानावर आहे.
भारत आणि लंका यांच्यातील झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीची टी-20 ताजी मानांकन यादी अपडेट करण्यात आली. कोहलीच्या भारतीय संघाने ही मालिका 2-0 अशी जिंकली. टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा के.एल. राहूल 760 मानांकन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. लंकेविरूद्धच्या मालिकेत राहूलने 26 मानांकन गुण मिळविले. या मालिकेत राहूलने दोन डावात अनुक्रमे 45 आणि 54 धावा जमविल्या. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल पाचव्या स्थानावर आहे.
विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी आणि वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत आपले अग्रस्थान राखले असून टी-20 मानांकनात तो नवव्या स्थानावर आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन 15 व्या स्थानावर असून मनिष पांडे 70 व्या स्थानावर आहे. टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या नवोदित वेगवान गोलंदाजांनी चांगली मजल मारली आहे.
चालू वर्षाअखेर ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय वेगवान गोलंदाजांना सरावासाठी चांगले प्रोत्साहन मिळू शकेल. नवोदित गोलंदाज नवदीप सैनीने लंकेविरूद्धच्या मालिकेत मालिकावीराचा बहुमान मिळविला. या कामगिरीमुळे सैनीने आयसीसीच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत 98 वे स्थान तर शार्दुल ठाकुरने 92 वे स्थान मिळविले आहे. सैनी आणि ठाकुर यांनी लंकेविरूद्धच्या मालिकेत प्रत्येकी पाच बळी मिळविले. बुमराह या यादीत 39 व्या स्थानावर आहे. लंकेच्या धनंजय डिसिल्वाने आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत 115 वे स्थान मिळविले आहे. तसेच लंकेचा फिरकी गोलंदाज सँडेकेन याने गोलंदाजांच्या मानांकन यादीत 29 वे स्थान घेतले आहे.
आयसीसीच्या टी-20 सांघिक मानांकनात भारत 260 गुणांसह पाचव्या स्थानावरआहे. लंकेविरूद्धच्या मालिकेत भारताला 2 गुण मिळाले तर लंकेला 2 गुण गमावावे लागले. लंका आणि अफगाण यांचे आता समान 236 मानांकन गुण झाले आहेत.









