दुबई / वृत्तसंस्था
टी-20 क्रिकेटमध्ये स्लो ओव्हररेटवर आणखी कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, अशी नवी नियमावली आयसीसीने शुक्रवारी जारी केली. टी-20 लढतीत निर्धारित वेळेत एखादा संघ षटके पूर्ण करत नसेल तर उर्वरित डावात 30 यार्डांच्या सर्कलबाहेरील एक क्षेत्ररक्षक कमी केला जाईल, असा नवा नियम आयसीसीने जाहीर केला. याच महिन्यापासून हा नवा नियम अंमलात आणला जाणार आहे.
टी-20 सामन्यात डावाच्या मध्यात ऐच्छिक ड्रिंक्स इंटर्व्हल घेता येईल, असेही आयसीसीने यावेळी जाहीर केले. स्लो ओव्हररेटबद्दल मात्र आयसीसीने कडक भूमिका घेतली आहे. आयसीसीतील 2.22 कलमानुसार संघांवर गुणांचा दंड व कर्णधार-संघाला आर्थिक दंड अशी तरतूद आहे. त्यात आता 30 यार्डाबाहेरील क्षेत्ररक्षकात कपातीची भर पडेल.
सध्याच्या नियमानुसार, पहिल्या 6 षटकांनंतर 30 यार्ड सर्कलबाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात करता येऊ शकतात. नव्या नियमानुसार, एखादा संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करवून घेत नसल्याचे निदर्शनास आल्यास 30 यार्ड सर्कलबाहेर 5 ऐवजी चारच क्षेत्ररक्षक ठेवता येतील आणि याचा क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला अर्थातच मोठा फटका बसू शकतो.









