सर्व व्यवहार बंद : पोलिसांचा पहारा, अनेक ठिकाणी रस्ते बंद, उपनगरांमध्ये शुकशुकाट
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. दक्षिण भागातील टिळकवाडी, शहापूर, अनगोळ, वडगाव या उपनगरांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. वाहनांची ये-जा पूर्णपणे थांबल्याचे चित्र दिसून आले. केवळ वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना सवलत देण्यात येत होती. पोलिसांनी बऱयाच ठिकाणी रस्ते बंद केले होते तर काही ठिकाणी चौकशी करूनच त्यांना पुढे सोडले जात होते.
लॉकडाऊनच्या मार्गसूचीप्रमाणे सकाळी दूध, भाजी, कडधान्ये यांच्या विक्रीस परवानगी देण्यात आली होती. सकाळच्या सत्रात हातगाडय़ांवर यांची विक्री करण्यात आली. परंतु कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. तसेच तुरळक ठिकाणीच भाजीची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले.
गाडय़ा नसल्याने नागरिकांची पायपीट
दुचाकी वापरण्यावर प्रशासनाने निर्बंध घातल्याने ये-जा करणे काहिसे कठिण झाले. डोक्मयावरून साहित्य घेवून नागरिकांना पायपीट करावी लागत होती. रेशन घेवून घरापर्यंत चालत जाण्याची वेळ नागरिकांवर आली. भाजी खरेदीसाठी बऱयाच जणांना अधिक मेहनत घ्यावी लागत होती. यामुळे वयोवृद्धांमधून नाराजीही व्यक्त करण्यात येत होती.
सकाळी शहापूरच्या खडेबाजार परिसरात काही प्रमाणात भाजी व फळांची विक्री करण्यात येत होती. वडगावमध्ये बाजार गल्ली, अनगोळ, टिळकवाडी येथील आरपीडी चौक परिसरात भाजीची विक्री केली जात होती. सामाजिक अंतर ठेवत भाजीची खरेदी केली. गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात होती. सकाळी 9 नंतर या उपनगरांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.









